पालघर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कौशल्य विकास उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक आदी मान्यवर उद्या पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गावरून मनोर येथून पालघर येथे येणारी व पालघर येथून मनोर कडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
पालघर तालुक्यातील मनोर जवळील दुर्वेस येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाच्या वतीने मनोर मैदान या ठिकाणी सामंजस्य करार कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अप्पर जिल्हा दंडाधिकारी सुभाष भागडे यांनी वाहतूक मार्गात बदल करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
हातनदी नाका ते नांदगाव फाटा यादरम्यान सर्व प्रकारची वाहतूक सोमवारी बंद ठेवण्यात आली आहे. तर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत मस्तान नाका ते मनोर मार्गे पालघर शहराकडे येणाऱ्या व पालघर शहराकडून मनोर मार्गे मस्तान नाकाकडे जाणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
मनोर मुंबई गुजरात बाजूकडून पालघर बाजूकडे जाण्यासाठी चिल्हार फाटा बोईसर मार्गे पालघर व वरई फाटा- पारगाव- तांदुळवाडी – चहाडे नाका मार्गे पालघर अशाप्रकारे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पालघर कडून मुंबईकडे जाण्यासाठी चार रस्ता ते चहाडे नाका – तांदूळवाडी- पारगाव वरई फाटा हायवे अशा प्रकारे आणि गुजरातकडे जाण्यासाठी पालघर चार रस्ता ते बोईसर चिल्हार फाटा हायवे मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे. दरम्यान अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी आदेश लागू राहणार नाही असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री करणार विद्यार्थ्यांचे स्वागत
जिल्ह्यात १६ जून रोजी शाळा सुरू होत असून, पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांचे थाटात स्वागत करण्यात येणार आहे. पालघर तालुक्यातील दुर्वेस येथील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांचे स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. तसेच यावेळी शाळेच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात येणार आहे. कौशल्य, रोजगार उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.