वाहतूक कोंडी कायम; पोलीस आणि नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाडा: वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी  मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या वाडा- नाशिक या राज्य मार्गाचे अलीकडेच कोटय़वधी रुपये खर्च करून रस्त्याचे रुंदीकरणाचे काम  करण्यात आले.  मात्र रुंदीकरण करण्यात आलेल्या जागेवर बेकायदा वाहने उभी केली जात असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.  

वाडा-नाशिक हा राज्य महामार्ग खंडेश्वरी नाका ते परळी नाका असा  एक किलोमीटर लांबीचा रस्ता वाडा शहरातील मुख्य बाजारपेठेतून जातो. बाजारपेठेतील या एक किलोमीटर अंतरामधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी  रस्त्याचे गेल्यावर्षी रुंदीकरण करण्यात आले.  मात्र, रस्त्याचा उपयोग बाजारपेठेत येणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहनधारकांनी वाहनतळ म्हणून  वापरण्यास सुरुवात केली आहे. खंडेश्वरी नाका ते परळी नाका या एक किलोमीटर लांबी रस्त्यामध्ये दुतर्फा दररोज १०० ते २०० चारचाकी वाहने व ३५० ते ५०० दुचाकी वाहने उभी असतात.  या वाहनांबरोबरच काही फेरीवाल्यांच्या हातगाडय़ाही उभ्या असतात.  रस्त्यालगत दुकानांचे मालक   हातगाडी चालविणाऱ्यांकडून प्रतिदिन ४०० ते ५०० रुपये भाडेवसुली करीत असतात. वाहनांमुळे व हातगाडय़ांमुळे या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करण्यासाठी कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.  रस्त्याच्या दुतर्फा भुयारी गटारींचेही काम करण्यात आले आहे,  गटारांवर काहींनी दुकाने थाटली आहेत. मात्र पोलीस आणि नगरपंचायत प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

नगरपंचायत प्रशासनाने वाडा शहरात ‘पे अ‍ॅण्ड पार्क’अंतर्गत वाहनतळाची सुविधा उपलब्ध केली तर या परिस्थितीत बदल होईल.

-प्रल्हाद सावंत, ग्रामस्थ, वाडा शहर.

अनेकदा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र शहरात कुठेही अधिकृत वाहनतळ नसल्याने ही परिस्थिती दिसून येते.

-सुधीर संखे, पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal parking on wide roads police ssh
First published on: 25-09-2021 at 01:07 IST