पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सातिवली येथील उड्डाणपुलाचे अपूर्ण असणाऱ्या कामामुळे तसेच सेवा रस्त्याची झालेली दयनीय अवस्था व सुरू केलेले काँक्रिटीकरण यामुळे या मार्गाच्या दुतर्फा तुफान वाहतूक कोंडी गेल्या पाच दिवसांपासून सुरूच आहे. या वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी म्हणून दहिसर बहाडोली या पर्यायी अंतर्गत रस्त्याचा वापर केला जात असल्याने या मार्गावर देखील वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे.
सातिवली उड्डाणपुलाच्या अपूर्णतेमुळे तसेच सेवा रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याने गेल्या बुधवारपासून या मार्गावर कोंडी होत आहे. त्यामध्येच मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर सेवा रस्ता तुलनात्मक अरुंद असल्याने वाहनांच्या रांगा १२-१५ किलोमीटर पलीकडे गेल्या आहेत. कालपासून याच वाहिनीवर जलद गतीने परिपक्व होणारे काँक्रिटीकरण हाती घेतल्याने मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर आशेरी गडाच्या पायथ्यापासून (चिल्हार) पासून थेट वरई फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येत असून सुमारे २० किलोमीटर अंतर ओलांडण्यासाठी तीन ते चार तासांचा अवधी लागत आहे.
मुंबईकडे गुजरात वाहिनीवर जाणाऱ्या मार्गीकेवर सातिवली पुलाजवळ अजूनही दुरुस्तीचे काम हाती घेतले नसल्याने तसेच खड्ड्यांमध्ये काही प्रमाणात खडी रेती टाकली गेल्याने या मार्गीकेवर खानिवडे टोल नाकापासून आठ ते १० किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. वाहतूक कोंडीची परिस्थिती दुपारनंतर काही तासांसाठी नियंत्रणात येत असली तरीही सायंकाळी पाच वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे अत्यंत त्रासदायक झाले आहे. गुगल मॅप्स व इतर रास्ता व ठिकाण पर्यंत पोहोचण्यास मार्गदर्शन करणारे पथदर्शक सॉफ्टवेअर मधून कोंडीचा भाग सध्या वगळण्यात येऊन वाहन चालकांना इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे सुचविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांवर देखील वाहतूक कोंडी होऊ लागल्याने सर्वसामान्य नागरिक या समस्येमध्ये भरडला गेला आहे. विमान प्रवास अथवा आरोग्य सेवेसाठी मुंबई गाठायची असल्यास सध्या रेल्वे शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. तर इतर भागातून येणाऱ्या नागरिकांना या वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे.
बहाडोली – दहिसर मार्गावर कोंडी
वसई विरार महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारी योजना धुकटण (बहाडोली) परिसरात असून या जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी तसेच विरार हुन सहजपणे येण्यासाठी वसई विरार महानगरपालिकेने वैतरणा नदीवर एकपदरी पुल उभारला आहे. या पुलाचा वापर करून स्थानिक मंडळी पालघर पासून वरईपर्यंत जाण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणून वापर करत आहेत.
राष्ट्रीय महामार्गावर तुफान कोंडी झाल्याने महामार्गावरील नागरिक आता या बहाडोली दहिसर मार्गाचा अवलंब करत असून खामलोली येथे असणाऱ्या या पुलाच्या दुतर्फा दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा गेल्या दोन दिवसांपासून दिसून येत आहे. विशेष म्हणजे वाहतूक नियंत्रणासाठी असलेल्या सिग्नल यंत्रणेचा अनादर करून परप्रांतीय वाहन चालक आगाऊपणा करत असल्याने त्या ठिकाणी देखील वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस अथवा ट्रॅफिक वॉर्डन ठेवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
धिम्या गतीने काँक्रीट करण्याचे काम
सातिवली पुलाच्या लगत सुमारे ७०० मीटरचा त्रिवार रस्ता असून प्रत्येक सेवा रस्त्याच्या एकामार्गिकेचे जलद मजबुतीकरण होणाऱ्या काँक्रीट अंथरण्याचे काम हाती घेण्यात आली आहे. या कामाच्या पहिल्या दिवशी काल अवघ्या ४०- ५० मीटरचे काम सुरू असून या गतीने काम सुरू राहिल्यास वाहतूक कोंडीचे समस्या महिना दीड महिना सुरू राहील अशी शक्यता आहे.
सातीवली पुलाच्या लगत शीघ्र गतीने मजबूत होणाऱ्या काँक्रिटीकरणाला आरंभ झाला असला तरीही आरएमसी (रेडीमेड काँक्रीट) मनोर येथील प्रकल्प ठिकाणाहून आणणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शिवाय सातत्याने पाऊस कोसळत असल्याने काँक्रीट करण्याची गती कमी राहिली आहे. संबंधित ठेकेदाराला दिवसा दोन व रात्री दोन असे चार कॉंक्रिटीकरण पथक कार्यरत ठेवून प्रतिदिन किमान २५०- ३०० मीटरची काँक्रिटीकरण होईल याकडे लक्ष देण्याचे सुचित करण्यात आले आहे. शिवाय वाहतूक कोंडी समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी ४० वॉर्डन कार्यरत करण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाला सुचित करण्यात आले असून या वॉर्डन चा खर्च संबंधित ठेकेदाराकडून वसूल करण्यात येणार आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.