आठ दिवसांपासून नागरिक त्रस्त; पाणीपुरवठय़ावरही परिणाम

कासा : गेल्या आठ दिवसांपासून कासा-चारोटी परिसरामध्ये विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे घरामध्ये डासांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. त्यात विजेअभावी पंखे बंद असल्याने अनेकांची झोपमोड होत आहे. या परिसरात पाणीपुरवठय़ासाठी ग्रामपंचायतीकडून कूपनलिकेवर विजेवर चालणारे पंप वापरले जातात, परंतु वीज खंडित होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपावर धाव घ्यावी लागत आहे.

कासा-चारोटी परिसरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. मध्यरात्री, सकाळी, दुपारी कोणत्याही वेळी वीजपुरवठा खंडित होत आहे. एकदा वीज गेल्यानंतर पाच-सहा तास पुरवठा सुरळीत होत नाही. तो सुरू झाला तरी कधी कमी दाबाने होत असल्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे, कूपनलिकांवरील पंप काम करत नाहीत. यामुळे गावकऱ्यांना भर पावसात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Pune records highest temperature in April in eleven years
पुण्यात अकरा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद; तापमानाचा आलेख कसा चढा राहिला?
power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
150 scrap godowns burnt down in Pimpri-Chinchwad
पिंपरी- चिंचवडमध्ये दिडशे भंगार गोडाऊन जळून खाक; १८ तासानंतरही धुमसतेय आग

बऱ्याचदा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर अचानक उच्च दाबाने वीजपुरवठा सुरू होतो. त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरातील दूरदर्शन संच, मिक्सर, पंखे असे विजेवर चालणारी उपकरणे निकामी होत आहेत. एकीकडे अवाच्या सवा वीज देयके भरून नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच विजेच्या लपंडावाने, अनियंत्रित विजेच्या दाबाने विजेची उपकरणे निकामी होऊन बसणारा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

या सर्व त्रासापासून नागरिकांची सुटका व्हावा म्हणून महावितरणने याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.

जीर्ण विद्युत खांब धोकादायक

वाडा : विक्रमगड तालुक्यातील अनेक भागांत विजेचे खांब जीर्ण झाले असून ते कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. ते खांब तातडीने बदलण्यात यावेत अशी मागणी साखरे-भडांगे पाडा येथील ग्रामस्थांनी केली आहे.

साखरे, पोचाडे, वाकी या परिसरांतील अनेक गाव, पाडय़ांमध्ये ३० ते ३५ वर्षांपूर्वी विद्यूत पुरवठा करण्यासाठी लोखंडी खांब उभे केले आहेत. या ३५ वर्षांत ते खांब बदलले गेले नसल्याने ते जीर्ण होऊ लागले आहेत. हे खांब जीर्ण झाल्याने खांब कधीही कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीर्ण झालेले ही विद्युत खांबे तातडीने बदलण्यात यावेत, अशी मागणी साखरे परिसरातील विविध पाडय़ांतील नागरिकांनी महावितरणकडे केली आहे.

नियमितपणे वीज बिल भरूनसुद्धा विजेच्या लपंडावाने हैराण केले आहे. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर अचानक उच्च दाबाने वीजपुरवठा सुरू झाल्याने माझ्या घरातील संगणक संच, पंखा आणि विजेचे बल्ब निकामी झाले आहेत. तरी महावितरणने याबाबत काहीतरी उपाययोजना करावी.

 – माणिक यादव, रहिवासी, कासा