पालघरच्या भाविका पाटीलची खडतर प्रवासातून गगनभरारी

नीरज राऊत/निखील मेस्त्री

Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
avimukteshwaranand saraswati
VIDEO : “गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देऊ”, नववर्षानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी व्यक्त केला संकल्प!
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’
simple tips and yoga to reduce PCOS problem
स्त्रियांनो, ‘PCOS’ चा त्रास कसा कराल कमी? आराम मिळण्यासाठी समजून घ्या तज्ज्ञांनी सुचविलेली ही पाच आसने

पालघर: लाचारीचे आयुष्य जगावे लागू नये यासाठी समाजात तृतीयपंथींना स्वीकारणे गरजेचे आहे. नव्या पिढीला शिक्षण व संस्कार देताना तृतीयपंथी यांच्याबद्दल योग्य माहिती दिली तर लिंग समानता साधणे सहज शक्य होईल व दारोदारी भीक मागण्याऐवजी तृतीयपंथी वेगवेगळय़ा व्यवसायात पदार्पण करू शकतील असे मत प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर गगन भरारी घेणाऱ्या पालघर जिल्ह्यातील भाविका पाटील यांनी व्यक्त केले. पालघर तालुक्यातील गोवाडे येथील गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या भावेश याला चार-पाच वर्षांचे झाल्यानंतर आपल्यातील वेगळेपण जाणवले. गोवाडे येथे प्राथमिक शिक्षण घेताना व मनोर येथील माध्यमिक शिक्षणाच्या दरम्यान समवयस्करांकडून  ‘बायल्या’ म्हणून  चिडवणे सहन करत त्याने दहावीपर्यंत शिक्षण खडतर पद्धतीने पूर्ण केले. या कालावधीत आपले आई-वडील व चुलत बहिणींनी केलेल्या मोलाच्या साथीमुळे शिक्षण पूर्ण करता आले. शिवणकामाचे शिक्षण तसेच एका नातेवाईकाच्या रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून  काम करत त्याने पालघर महाविद्यालयात अकरावी इयत्तेत प्रवेश घेतला. मात्र इतर विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या  जाचाला कंटाळून त्याने महाविद्यालयात शिक्षण सोडून मुक्त विद्यापीठातून बारावीचे शिक्षण पूर्ण केले.

‘आपण कोण आहे’ हे ओळखल्याने तसेच जगाला आपले कर्तृत्व दाखवून देण्याच्या जिद्दीने भावेशने आपले घर सोडले व केलेल्या कामातून संकलित केलेल्या पैशातून विरार येथे भाडय़ाच्या घरात राहून ‘स्त्री’ म्हणून जगण्यास आरंभ केला. तेथून ती आपली भाविका या नावाने ओळख करून देऊ लागली. शिक्षणाची ओढ असल्याने शस्त्रक्रिया साहाय्यक (ऑपरेशन असिस्टंट) या अभ्यासक्रमासाठी नाव नोंदविले. विविध ठिकाणी रांगोळय़ा काढून, नृत्य व लावणी कार्यक्रमात सहभागी होऊन तसेच रुग्णालयात अर्धवेळ नोकरी करत शिक्षण पूर्ण केले.  मीरा रोड येथील एका रुग्णालयात काम करण्याची संधी मिळाली असता आपल्या कार्यशैलीमुळे त्या अल्पावधीतच कायम झाल्या. मात्र त्या ठिकाणी देखील वरिष्ठ सहकाऱ्यांचा जाच होतच राहिल्याने तीन-चार वर्षांत तिला नोकरी सोडावी लागली. छोटय़ा पडद्यावरील  मालिकांमध्ये काही भूमिका केल्या. नंतर दहिसर व कल्याण येथील डान्स बारमध्ये देखील तिने  काही काळ काम केले. सलमा खान यांच्या ‘किन्नर माँ- एक सामाजिक संस्था’ च्या माध्यमातून शासनातर्फे पालघर जिल्ह्यात शौचालय सर्वेक्षण करण्यात आले. त्यातही तिची भूमिका महत्त्वाची ठरली.  वयाच्या १७ व्यावर्षीपासून ती विरार-नालासोपारा येथे वास्तव्य करीत असून करोना टाळेबंदी काळात तृतीयपंथींसाठी तिने दररोज ३० किलो खिचडीचे वितरण केले.

भाविका हिने यश संपादन केल्यानंतर समाजाचा तिच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला.  तिच्याबद्दल आपुलकी वाटू लागली.  सर्व कौटुंबिक व मित्रपरिवार तिच्या सोबत छायाचित्र काढून समाज माध्यमांवर टाकू लागले. तृतीयपंथींना स्वत:चा निवारा असणे गरजेचे असून समाजाने स्वीकारल्यास तृतीयपंथी वेगवेगळय़ा व्यवसायामध्ये पदार्पण करू शकतील असे तिचे मत आहे. या कामासोबत  अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ती गोवाडे येथे काम करीत असून अनेक बांधवांच्या व्यसन मुक्तीसाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. तृतीयपंथी हे जन्मजात अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून त्यांना अनेक कलागुण उपजत येत असतात.  अशा व्यक्तींना शिक्षण व मार्गदर्शनाची जोड लाभल्यास त्या समाजात सन्मानाने जगू शकतील असे तिचे मत आहे. तृतीयपंथी बांधवांना आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि समुपदेशनाची गरज आहे. समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी बालमनावर शिक्षण व संस्कार रुजविल्यास ‘लिंग समानता’  स्थापन होण्यास सहज व सोपे होईल. तृतीयपंथींना सन्मानाने जगण्यासाठी प्रशासन व सामाजिक संस्थांनी एकत्रित पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे. दृष्टिकोन बदलावा योग्य शिक्षण आणि संस्कारामुळे  ‘लिंग समानता’ रुजण्यास  आणि तृतीयपंथीयांविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी मदत होईल.

यशस्वी कारकिर्द

‘सावधान इंडिया’ या मालिकेत काम केल्याच्या अनुभवानंतर यशराज प्रोडक्शन तृतीयपंथी संदर्भात जनजागृतीसाठी निर्माण केलेल्या ‘सिक्स पॅक बँड’ मध्ये तिची सर्वप्रथम निवड झाली. या बँडच्या ‘हम है हॅपी’ व ऋतिक रोशन सोबतच्या ‘ए राजू’ ही गाणी सुपर हिट झाल्यानंतर तिने वेगवेगळय़ा चित्रपटांचे प्रमोशन केले.  नामांकित उत्पादनांसाठी जाहिरातीमध्ये तिला भूमिका मिळत गेल्या. २०१७-१८  या वर्षांतील कांस ग्लायन्स  फिल्म फेस्टिवलमध्ये या बँडला पुरस्कार मिळाला. पाठोपाठ गिनिस बुकमध्ये तृतीयपंथीकडून सर्वोत्तम सर्जनशील व्यक्ती म्हणून नोंद झाल्याने जागतिक पातळीवर त्यांच्या कार्याची नोंद घेण्यात आली. याच बँडच्या जागतिक दौऱ्यानिमित्ताने जर्मनी, पॅरिस व लंडनसारख्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले. २०१९ मध्ये निवडणूक आयोगाने केलेल्या जनजागृती चित्रफितीमध्ये भाविकाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. वेगवेगळय़ा विद्यापीठांनी तसेच फेसबुक व हिंदूस्थान युनिलिव्हर सारख्या जागतिक कंपनीने तिला ‘तृतीयपंथी वक्ता’ म्हणून विविध व्यासपीठांवर बोलण्याची संधी दिली. जानेवारी २०२० मध्ये दुबई फेस्टिवलमध्ये तिने भारतीय तृतीयपंथी मॉडेल म्हणून काम केले.

स्वयंपूर्ण करण्याचा प्रशासकीय प्रयत्न

तृतीयपंथींना उदरनिर्वाहासाठी  व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे यासाठी  जिल्हा परिषद सदस्य नीता समीर पाटील यांच्या प्रयत्नााने पालघर जिल्हा परिषदेने वार्षिक पाच लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.  निधीमधून आगामी काळात जिल्ह्यातील तृतीयपंथींना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे.