पालघर :राज्यातील वनक्षेत्र वाढवण्याच्या दृष्टिकोनातून यंदाच्या वर्षी एक कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प राज्य सरकारने सोडला असून त्या अनुषंगाने व पालघर नगर परिषदेच्या वर्धापन दिनाच्या औचित्यच आहे वन विभागाच्या सहकार्याने नगरपरिषदेने वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला होता.

राष्ट्रीय वन धोरण, १९८८ नुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वने आणि वृक्षाच्छादित असले पाहिजेत. India State of Forest Report (ISFR) २०२३ नुसार, महाराष्ट्राचे वन (१६.५३ टक्के) आणि वृक्षाच्छादन (४.७२ टक्के) असे एकूण २१.२५ टक्के क्षेत्र वन आणि वृक्षाच्छादित आहे. उपरोक्त ३३ टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ११.७५ टक्के वन आणि वृक्षाच्छादन वाढविणे आवश्यक आहे.

आपली वसुंधरा ही आपली खरी शक्ती आणि जीवनाचा आधार आहे. तिचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. “हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्” या अभियांनांतर्गत वर्ष २०२५ करिता एक कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांच्यामार्फत देण्यात आले आहेत. या संकल्पनेतून राज्यात सन २०२५ च्या पावसाळ्यामध्ये वृक्ष लागवड मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पालघर नगरपरिषदेला दिलेले ध्येय साध्य करण्यासाठी मदत व्हावी म्हणून, वन विभाग डहाणू येथून देशी जातीचे चिंच, वड, हिरडा, टेटू, वृक्ष मागविण्यात आली होती. १८ सप्टेंबर रोजी पालघर नगरपरिषद वर्धापन दिनाचे औचित्य साधून पालघर नगरपरिषद मार्फत आनंद दिघे गार्डन, विष्णू नगर पालघर येथे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुप्रिया गुरव, स्वच्छता निरीक्षक भूषण काबाडी व किरण सावर, इतर नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.

स्वच्छता ही सेवा अभियान

“स्वच्छता ही सेवा 2025” हा अभियान गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार या विभागामार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अपर्ण करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी २०१७ पासून वार्षिक ‘स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा’ हा सप्टेंबर महिन्यात साजरा करण्यात येतो. यंदा हा अभियान १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या दरम्यान देशभरात सर्वत्र राबविण्यात येणार असून या वर्षी “स्वच्छोत्सव” ही अभियानाची थीम असणार आहे. मोठ्या प्रमाणावर गलिच्छ व अस्वच्छ ठिकाणे साफ करण्यासाठी स्वच्छता मोहिम राबविणे, या मोहिमेस नागरिकांचे समर्थन व सहभाग, स्वच्छता कामगारांच्या योगदानाची ओळख स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि कल्याण यांना प्राधान्य देणे आणि पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरे करणे, भारतातील स्वच्छता आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाच्या भविष्यासाठी वचनबद्धतेची पुष्टी करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

या मोहिमे अंतर्गत वृक्षारोपणा नंतर स्वच्छतेची शपथ घेण्यात आली व मोहीम प्रभावीपणे राबवून पालघर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, आपले पालघर शहर स्वच्छ व सुंदर बनवणे हि आपली जबाबदारी आहे, स्वच्छतेची सुरुवात ही स्वतःपासून करावी असा संकल्प करण्यात आला.