पालघर : शारीरिक अपंगत्वासोबत समाजामध्ये कार्यात्मक व मानसिक दृष्ट्या दुर्बल होणार्या नागरिकांची संख्या लक्षणीय असून अशा अपंग असणार्या व्यक्तींना सहानुभूतीने तसेच सहानुभूतीने वागणूक देणे आवश्यक आहे. आपल्या सोबत आपल्या पाल्यांना देखील अपंगांसोबत भेदभाव न करण्याबाबत जागृत करणे व त्यांच्याप्रति समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण विभागातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन कार्यालयात अपंगांप्रती संवेदनशलता जागृती एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेला जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अपंग व्यक्ती सोबत वागणूक करण्याबाबत कर्मचारी व अधिकारी यांना जाणीव करून देण्यासाठी आयोजित या कार्यशाळेबद्दल जिल्हाधिकारी यांनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर यांचे अभिनंदन केले. अपंग व्यक्तींना फक्त सहानुभूती न दाखवताना आपल्याकडे असणाऱ्या विविध शासकिय योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे व अशा व्यक्तींना योजनांचा लाभ मिळवून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतले. शासकिय कामांसाठी आलेल्या अपंग व्यक्तींना तत्परतेने सेवा देणे व समाजामध्ये त्यांना वावरण्याकरिता आवश्यक वातावरण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी पुढे सांगीतले.
पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी अपंगांकरिता असलेल्या शासकीय योजना पोचविण्यासाठी प्रयत्न करावे, आपल्या कार्यालयामध्ये अशा व्यक्तींकरिता वावरण्यासाठी सुलभता निर्माण करणे व त्यांना सन्मान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील अपंगांची माहिती सर्व शासकीय कार्यालयांना पुरवली गेल्यास त्यांच्या मदतीसाठी विविध विभाग प्रयत्न करतील असेही सांगितले. अपंगांमध्ये आदर असण्यामागील त्यांनी आपली घरगुती पार्श्वभूमी सांगून उपस्थितांचे मन जिंकले.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी अपंगांसाठी असणार्या तरतुदी त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात व त्यांचा आदर राखण्याबाबत उपस्थित झाला सूचना दिल्या. अपंगांना सोबत घेऊन जिल्ह्याच्या विकास घडवूया असेही त्यांनी प्रतिपादन केले.
याप्रसंगी अपंगांना असणाऱ्या विविध योजनांबाबत कौशल्य विकास विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेच्या वित्त विभाग यांनी उपस्थित झाला माहिती दिली. एडवोकेट राहुल ठाकरे व एडवोकेट राजेश राऊत यांनी अपंग विषय कायदे तसेच ॲट्रॉसिटी कायदा विषयी माहिती दिली. याप्रसंगी उपस्थितांना अपंगांविषयी व संबंधित कायद्यान विषयी माहिती देण्यासाठी अपंगांची निगडित संस्थांच्या प्रतिनिधीने सादरीकरण केले.
सिकलसेल धारकांना अपंगत्व कार्ड
अपंगांच्या अनुषंगाने सन २०१६ च्या सुधारित कायद्यानुसार सिकलसेल, थैलेसिमिया सारख्या आजारांनी ग्रस्त नागरिकांना अपंग प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आले असून जिल्ह्यातील सुमारे दोन हजार सिकल शेलधारकांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी याप्रसंगी दिली.
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत सर्व तालुक्यांमध्ये अपंगत्व असणार्या नागरिकांची माहिती घेण्यासाठी तसेच त्यांना सलभतेने प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन केले जात असून अपंगांचे प्रमाणीकरण करण्यास किमान त्रास व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगीतले.