पालघर : पावसाळ्यामुळे झालेल्या खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी रस्त्यांवर टाकलेल्या खडी (ग्रिट) आणि दगड-कपचीमुळे आता पालघर शहर धुळमय झाले आहे. शहराचे मुख्य मार्ग, जे प्रवाशांसाठी लाईफलाईन आहेत, त्यांची दुरवस्था अजूनही कायम असल्याने रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांमुळे या ग्रिटचे रूपांतर बारीक धुळीत झाले आहे. यामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमालीचे वाढले असून वायू प्रदूषणाचा धोका गंभीर स्तरावर पोहोचला आहे.

शहरातील पालघर-बोईसर, मनोर, माहीम कडे जाणारे मार्ग आणि मुख्य चौक, पालघर पूर्व तसेच स्टेशन मार्गावर खड्ड्यांची समस्या पूर्वीपासूनच होती, ज्यात पावसाळ्यात आणखी भर पडली. या खड्ड्यांमध्ये भरलेला ग्रिट आणि खडी आता वाहनांच्या चाकांखाली बारीक होऊन हवेत मिसळत आहे. त्यामुळे, हवा गुणवत्ता निर्देशांक १२० च्या जवळपास पोहोचला असून, ही वाईट पातळी मानली जाते.

वाढत्या धुळीमुळे शहरातील दृश्यमानता कमी झाली असून, धुक्याची पातळीही वाढल्याचे चित्र आहे. याचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना आणि वाहनचालकांना बसत आहे. अनेकांना श्वसनाचे त्रास, दमा आणि अन्य श्वासविकार जाणवू लागले आहेत. आरोग्याच्या या धोक्यामुळे महिला आता डोळ्यांच्या आणि त्वचेच्या संरक्षणासाठी गॉगल आणि स्कार्फ वापरत आहेत, तर पुरुष मंडळी दुचाकी चालवताना मास्कचा उपयोग करताना दिसत आहेत.

व्यावसायिकांचे मोठे नुकसान

केवळ आरोग्यावरच नाही, तर या धुळीचा परिणाम स्थानिक व्यवसायांवरही होत आहे. मुख्यमार्गांवर असलेल्या कपड्यांच्या आणि इतर वस्तूंच्या दुकानांमध्ये धुळीचे कण जमा होऊन वस्तू खराब होत आहेत. त्यामुळे, दुकानदार दररोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असे वारंवार दुकानांसमोर पाणी शिंपडून तात्पुरता उपाय करत आहेत, जेणेकरून धूळ खाली दबून बसावी.

प्रशासन मात्र सुस्त! रस्ते दुरुस्ती कधी होणार?

सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार आश्वासन दिले होते की पावसाळ्यानंतर खड्डे कायमस्वरूपी भरले जातील आणि काही रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेतले जाईल. मात्र पाऊस थांबून पंधरा दिवसांहून अधिक काळ उलटला तरी कोणत्याही मुख्य मार्गावर खड्डे भरणीचे किंवा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. या सततच्या त्रासामुळे नागरिक आणि प्रवासी संतप्त झाले आहेत. खड्ड्यांमुळे होणारे अपघात, वाहनांचे नुकसान आणि आता वाढत्या धुळीमुळे होणारा श्वसनाचा त्रास यामुळे नागरिकांची गैरसोय वाढत आहे. प्रशासनाच्या या उदासीन धोरणाविरुद्ध नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून, तात्काळ कायमस्वरूपी रस्ते दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांकडून मास्क वाटप

पालघर येथील सामाजिक कार्यकर्ते व मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरातील चौकांमध्ये, मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर, दुकानांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धुळीचा त्रास होऊ नये या अनुषंगाने मास्कचे मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून वाटप करण्यात येत आहे. यापूर्वी देखील २०१२ मध्ये धुळीचा त्रास वाढल्याने काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून मास्क वाटप करण्यात आले असल्याचे तत्कालीन सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

पालघर शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत उपाययोजना म्हणून लवकरच नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाकडून डांबरी रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात करत आहोत. दिवाळीच्या सुरुवातीपर्यंत आपण महत्त्वाचे रस्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. – प्रशांत जाधव, मुख्याधिकारी, पालघर नगर परिषद