पालघर : अपंग बांधवांचा आत्मसन्मान, आत्मनिर्भरता आणि सामाजिक समावेश या मूल्यांना चालना देण्यासोबत अपंग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांच्या स्पर्धा आयोजित करणे तसेच अपंग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या उत्पादनांचे प्रदर्शन करण्या च्या उद्देशाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात “पर्पल फेअर २०२५” हा अपंग सक्षमीकरणासाठीच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात अशा पद्धतीचा हा सर्वप्रथम उपक्रम राबवण्यात आला असून याच धरतीवर इतर जिल्ह्यांमध्ये अपंगांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे आयोजन अली यावर जंग राष्ट्रीय वाचा आणि श्रवण दिव्यांगजन संस्था, बांद्रा मुंबई, जिल्हा परिषद पालघरच्या समाजकल्याण विभागाच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली करण्यात आले होते. अली यावर जंग संस्थेचे संचालक डॉ. सुमन कुमार, माजी संचालक डॉ.राजू आराख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या फेअरमध्ये जिल्हा प्रशासन, अपंग कल्याण विभाग, सामाजिक कल्याण विभाग, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र विरार, विविध स्वयंसेवी संस्था आणि विशेष शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन
अनुसूचित जाती- जमाती आयोगाच्या सदस्या तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष वैदेही वाढाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी सुभाष बागडे, उपायुक्त तथा दिव्यांग पुनर्वसन अधिकारी नितीन ढगे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर, तसेच अपंग सक्षमीकरणासाठी विशेष कार्य करणाऱ्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रमिलाताई कोकड यांच्या उपस्थितीत झाले.
या फेअरमध्ये जिल्हाभरातील १८ शाळांमधील २०७ अपंग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धांमध्ये आपली कला, खेळगुण आणि आत्मविश्वास सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. सॅक रेस, ग्लास मनोरा रचना, फुगे फुगवणे, कॅरम अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. अपंग उद्योजक आणि कलाकारांसाठी १७ स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये त्यांच्या उत्पादने आणि कलाकृतींचे सादरीकरण करण्यात आले. एलिम्को संस्थेमार्फत दिव्यांगांना सहाय्यक साहित्याचे वाटपही करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थितांशी बोलताना रवींद्र शिंदे म्हणाले की, आपण हा अपंग विद्यार्थ्यांचा उत्सव साजरा करीत आहोत, त्यांच्या आनंदात सहभागी होणे ही आपली जबाबदारी आहे असे सांगितले. नितीन ढगे यांनी अपंग मुलांना घरात न ठेवता समाजात घेऊन जाण्याचे आवाहन करताना, समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांचा समावेश करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. वैदेही वाढाण यांनी अली यावर जंग संस्थेच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, शासन आणि संस्था मिळून अपंगांच्या सक्षमीकरणासाठी कटीबद्ध आहेत आणि त्यामुळे समाजात सकारात्मक विश्वास निर्माण होत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुमन कुमार यांनी सादर केले, तर डॉ. राजू आरख यांनी आभार मानत कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रमिलाताई कोकड यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.
“पर्पल फेअर २०२५” या उपक्रमाच्या माध्यमातून अपंग बांधवांसाठी रोजगार, कला, क्रीडा, सहाय्यक साधने आणि शासकीय योजनांची माहिती या सर्व क्षेत्रात एकाच ठिकाणी संधी उपलब्ध करून देण्यात आली. या भव्य उपक्रमाची सुरुवात भारत सरकारने पालघर जिल्ह्यातून केली असून, हा उपक्रम भविष्यातही अपंगांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद पालघरचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, अपंगांच्या शाळांचे प्रतिनिधी पालक तसेच अपंग विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.