पालघर : नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा आज असलेल्या शाळेतील काही शिक्षकांचे ६ एप्रिल रोजी सकाळ सत्रात निवडणूक प्रशिक्षण असल्याने शिक्षकांची तारांबळ उडाली असून मूल्यांकन चाचणी घेऊन निवडणूक प्रशिक्षणास वेळेत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागली. बँक कर्मचारी व परीक्षेमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना दुसऱ्या सत्रात अथवा उद्या रविवारी प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्याच्या जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचना निवडणूक कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचल्या नसल्याने जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेतील समन्वयाचा अभाव दिसून आले आहे.

नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन २ द्वारे शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या आणि खासगी अनुदानित शाळेतील तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची दहा माध्यमात चाचणी घेण्यात येणार असल्याचा शासन निर्णय २५ मार्च रोजी जारी करण्यात आला होता. याद्वारे सर्व शाळांतील मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख तसेच शिक्षकांना व विद्यार्थ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.

हेही वाचा – नाशिकमध्ये महायुतीत अचानक शांतता

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिक्षकांची निवडणूक कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्या अनुषंगाने निवडणूक प्रशिक्षण देण्यात येत असल्याने जिल्ह्यातील शिक्षकांचे निवडणूक प्रशिक्षण ६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे या दिवशी संकलित मूल्यांकन चाचणी सकाळी ८ ते १० वाजेदरम्यान घेऊन अनेकांना निवडणूक प्रशिक्षण सकाळच्या सत्रात असल्याने त्रासदायक ठरल्याची माहिती शिक्षकांकडून देण्यात आली.

अनेक बँक कर्मचाऱ्यांना देखील शनिवारच्या प्रशिक्षणाचे आदेश बजावण्यात आले होते. मात्र बँक सुरू असल्याने त्यांना व नियतकालिक मूल्यांकन परीक्षेत सहभागी असणाऱ्या शिक्षकांना दुपारच्या सत्रात अथवा रविवारी आयोजित होणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी करून घेण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला होता. मात्र शिक्षकांपर्यंत हा निर्णय पोहोचवण्यास जिल्हा प्रशासन व शिक्षण विभाग अपयशी ठरल्याचे दिसून आले.

याउलट शिक्षणाधिकारी यांनी काल सायंकाळी समाज माध्यमांद्वारे केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक सूचना पाठवून मूल्यांकन चाचणी सकाळी ७ ते ९ या वेळात घेण्याचे सुचित केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तरी देखील दूरवर असणाऱ्या शाळेतील शिक्षकांनी मूल्यांकन चाचणी घेऊन निवडणूक प्रशिक्षण वेळेत कसे पोहोचायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच अचानक बदललेल्या वेळेची सूचना विद्यार्थ्यांना कशी द्यायची याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

सात वाजता परीक्षा घेणे योग्य आहे का?

मागील वर्षी राज्य शासनाने अध्यादेश काढला असून राज्यातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत बदल करून प्राथमिक वर्ग सकाळी नऊ नंतर भरवण्याचा शासन निर्णय जाहीर केला होता. मात्र नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यांकन चाचणी तिसरी ते आठवी या वर्गाची सकाळी आठ वाजता घेण्यात आल्याने शासनाच्या निर्णयाशी विसंगत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – केजरीवालांच्या अटकेचा धक्का कोणाला आणि का?

परिचारिका अद्याप संभ्रमात

जिल्ह्यातील परिचारिकांना निवडणूक कर्मचारी म्हणून नेमणूक केली असून त्यांचे आदेश रद्द केल्याबाबत अजूनही स्थानिक पातळीवर निरोप मिळाले नसल्याकडे परिचारिका संघटनेचे पदाधिकारी यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे काही परिचारिकांना आपले काम सांभाळून निवडणूक प्रशिक्षण घेण्याची पाळी ओढवली जाणार असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.