पालघर : पालघर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत अनेक त्रुटी मुळे सदोष असल्याचे आरोप भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार), मनसे व इतर पक्षां तर्फे करण्यात आले आहेत.
प्रारूप यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी नगरपरिषदेकडे २००० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले असून पालघर शहराची अंतिम निवडणूक यादी ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
पालघर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे दिसून आले आहे. अनेक मयत मतदारांची नाव मतदार यादीत समाविष्ट असून एकाच प्रभागात मतदारांची दुबार नावे असणे, वेगवेगळ्या प्रभागांमध्ये एकच मतदाराचे नाव दोन किंवा तीन वेळा नाव प्रसिद्ध असणे, प्रभागात प्रत्यक्षपणे वास्तव्य करत नसणाऱ्या मतदाराचा मतदार यादी समाविष्ट असणे, प्रसिद्ध मतदार यादीमध्ये मतदाराचा पत्ता उल्लेखित नसणे, पालघर शहराबाहेर गावांमध्ये रहिवासी पत्ता असणार्या मतदारांची मतदार यादी समाविष्ट असते तसेच प्रत्यक्षात एका प्रभागात वास्तव्य करत असताना दुसऱ्या प्रभागाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट असणे यासह इतर काही त्रुटी असल्याचे बहुतांश राजकीय पक्षांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
याच बरोबरीने प्रभागाच्या रचनेत समाविष्ट नसलेल्या भागातील मतदारांचा समावेश झाल्याच्या घटना अनेक प्रभागात दिसून आल्याने विविध राजकीय पक्ष व नागरिकांनी या बाबत आक्षेप नोंदविले आहेत.
प्रारूप मतदार यादीवर हरकत घेण्यासाठी १३ ऑक्टोबर पर्यंत प्रथम मुदत होती मात्र राज्यात अनेक ठिकाणी प्रारूप यादीत अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्याने प्रभाग बदल करण्यासंदर्भात अर्ज करण्याची मुदत १७ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली होती. प्रारूप यादी मधील त्रुटी दूर करण्यासाठी व विशेषतः वेगवेगळ्या प्रभागात चुकीच्या पद्धतीने समाविष्ट झालेल्या नागरिकांना त्यांच्या निवासाच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी आज (ता १७) पर्यंत २००० पेक्षा अधिक अर्ज करण्यात आले आहेत.
याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर या अर्जांसोबत असलेल्या पुराव्यांचे तसेच नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी केलेल्या स्थळ पाहणी संदर्भातील अहवाल याच्या आधारे छाननी होऊन अंतिम निर्णय घेऊन ३१ ऑक्टोबर रोजी पालघर नगरपरिषद निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी अंतिम ग्राह्य धरली झाल्याने अधिकतर मतदार यादीतील दोषांचे निराकरण होणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे या आक्षेप नोंदणी दरम्यान मतदारांचे प्रभाग बदलण्यासंदर्भात मुभा असली तरी मतदार वगळण्याची तरतूद नाही. यामुळे प्रभागाबाहेरील तसेच शहराबाहेरील मतदारांकडून मतदान करून घेऊ मतदान प्रक्रिया प्रभावित करण्याचा काही राजकीय पक्ष व राजकीय मंडळींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे आरोप होत आहेत.
आक्षेप घेण्यात आलेल्या मतदारांच्या वास्तव्याच्या ठिकाणाची शहनिशा करणे तसेच प्रत्यक्षात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी पाहणी करून त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या अहवालावर त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घ्यावा अशी मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे तसेच नगरपरिषदेकडे तक्रार करण्यात आल्या आहेत. यामुळे यापूर्वी राबवण्यात आलेल्या मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण व शुद्धीकरण प्रक्रिया असफल ठरल्याचे दिसून आले आहे.
त्रुटी मागील काही कारण ..
नगरपरिषदेची मतदार यादी तयार करताना विधानसभेच्या निवडणुकीत वापरण्यात आलेल्या मतदार यादी चा आधार घेण्यात आला होता. मात्र प्रभागाची हद्द निश्चित झाल्यानंतर संबंधित यादीमध्ये भाग क्रमांक व प्रगणक यांची आवश्यक प्रमाणात माहिती देण्यात आली नाही. अनेक ठिकाणी प्रत्यक्षात प्रभाग रचनेत अंतिम झालेल्या भागाचा समावेश नसून असे संपूर्ण भाग इतर प्रभागात समाविष्ट झाल्याचे देखील दिसून आले आहे.
तसेच काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मतदार यादी फोडली गेल्याने त्यामध्ये त्रुटी उद्भवल्याचे सांगण्यात येते. तसेच प्रारूप मतदार यादी बनवताना प्रत्यक्षात स्थळ पाहणे करणे व नवीन अर्जां ची योग्य प्रकारे पडताळणी न झाल्याने प्रारूप मतदार यादीत त्रुटी राहिल्याचे सांगण्यात येते.
आक्षेपात देखील गैरप्रकार …
मतदार यादीत अनेक त्रुटी असल्याची ओरड सर्वच राजकीय पक्ष करीत असताना आपल्याला आवश्यक असणारे मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी अथवा नापसंतीचे मतदार इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी अर्ज भरताना बनवट सह्या व लाईट बिलांमध्ये झेरॉक्स च्या माध्यमातून गैरप्रकारे बदल करून वापर केला गेला असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. लाईट बिलांची प्रत्यक्ष पडताळणी करून बनावट कागदपत्रांच्या पुरावा देणार्या अर्जदारांविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुनर्निरीक्षण कार्यक्रम फसला
मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने वारंवार पुर्ननिरीक्षण कार्यक्रम राबवला होता. या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी प्रत्यक्षात स्थळपाहणी करून मतदार यादीतील त्रुटी दूर करणे अपेक्षित होते.
मात्र या कामाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष झाल्याने या मतदार यादी शुद्धीकरण प्रक्रिया प्रभावीपणे राबवली नसल्याचे पुढे आलेल्या आक्षेपांकडून स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये काही मतदारांचे इतर प्रभागामध्ये स्थलांतर होणे, काही मतदारांची नावे वगळण्यात यावे असे झाल्याचे आरोप राजकीय पक्षांकडून करण्यात येते.
प्रारूप मतदार यादी मधील त्रुटी संदर्भात विविध राजकीय पक्ष तसेच नागरिकांना अर्ज दाखल करण्याचे आव्हान करण्यात आले होते. आज असे अर्ज स्वीकारण्याचे अंतिम दिवस असताना प्राप्त झालेल्या अर्जां संदर्भात निर्णय घेण्यापूर्वी नगरपरिषदेच्या जबाबदार व्यक्तीकडून स्थळ पाणी करून मतदाराच्या अधिवासा संदर्भात निश्चिती करण्यात येणार आहे. शिवाय मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत त्रुटी दूर करण्यासाठी स्वतःहून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. – प्रशांत जाधव, मुख्याधिकारी पालघर.