बोईसर : पालघर जिल्ह्यातून जात असलेल्या मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या प्रगतीत पावसाचा अडथळा निर्माण झाला आहे. पावसाळ्यातील तीन ते चार महिने महामार्ग बांधणीचे काम ठप्प राहणार असल्यामुळे पालघर जिल्ह्यातील संपूर्ण टप्पा वाहतुकीसाठी खुला होण्यासाठी आणखी आठ ते बारा महिन्यांचा कालावधी लागण्याची शकयता आहे.
दिल्ली-मुंबई द्रुतगती महामामार्गाचा भाग असलेल्या मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाचे पालघर जिल्ह्यातील तलासरी ते शिरसाड पर्यंत एकूण ७८ किलोमीटर अंतर असलेल्या ११,१२ आणि १३ क्रमांकाच्या टप्प्यांचे अंदाजे ८० ते ८५ टक्के स्थापत्य काम पूर्णत्वास आले आहे. वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातील ५१ गावांतून हा द्रुतगती महामार्ग जात आहे. सन २०२२ मध्ये महामार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात करण्यात येऊन डिसेंबर २०२५ पर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत कंत्राटदारांना काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती.
मात्र पावसामुळे वर्षातील जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत रस्ते चिखलमय होऊन काम सुरु असलेल्या ठिकाणी वाहनांमधून गौणखनिज, बांधकाम साहित्य आणि यंत्रसामग्री पोचवणे शक्य होत नसल्याने कंत्राटदाराला काम बंद करावे लागते. त्यामुळे वर्षातील फक्त आठ महिने द्रुतगती महामार्गाचे प्रत्यक्ष बांधकाम करण्याची संधी मिळत असून यावर्षी मे महिन्यातच वळीवाच्या पावसाने हजेरी लावल्याने बांधकामाच्या प्रगतीला खीळ बसली असून तिन्ही टप्पे पूर्ण होण्यासाठी आणखी आठ ते बारा महिने वाट पाहावी लागणार आहे.
वैतरणा नदीवरील पुलांची कामे आव्हानात्मक :
मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गावरील मासवण ते शिरसाड हा २७ किलोमीटरचा टप्पा बांधकामासाठी सर्वात आव्हानात्मक ठरला आहे. या टप्प्यात वैतरणा नदीवरील तीन पुलांच्या कामाचा समावेश असून बहाडोली आणि वैतरणा खाडीवरील वाढीव बेटाजवळील दोन पुलांची कामे पूर्ण झाली असून पारगाव सोनावे येथील पुलाचे काम अपूर्ण स्थितीत आहे. पावसाळ्यात वैतरणा नदी दुथडी भरून वाहत असल्याने कामगारांसाठी नदीपात्रातील पुलांच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने काम करणे धोकादायक असल्याने कामाचा वेग थंडावला आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील भार कमी होणार :
मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाचा तलासरी ते शिरसाड हा ७८ किलोमीटरचा टप्पा पुढील वर्षात वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. हा टप्पा खुला झाल्यानंतर सध्याच्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला पर्याय निर्माण झाल्याने वाहतुकीचा भार कमी होऊन वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून वाहन चालकांची सुटका होत दिलासा मिळू शकणार आहे.