पालघर / बोईसर : पालघर जिल्ह्यात पावसाने जून ते सप्टेंबपर्यंत चार महिन्यांची सरासरी ओलांडली आहे. समाधानकारक पडणाऱ्या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला असून प्रमुख धरणे काठोकाठ भरल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्नदेखील सुटला आहे. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांत आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक ११२.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी २३५७ मिमी पावसाची नोंद होते. मात्र या वर्षी सरासरीपेक्षा जास्त २६२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसाच्या दडीने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यातील पावसाने चांगलाच दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या भातासोबतच भाजीपाला आणि डोंगराळ भागातील नागली, वरी या पिकांची उत्तम वाढ होत असून हलवार जातीच्या भाताच्या कणसांमध्ये दाणा भरण्यास सुरुवात झाली आहे. उत्तम पावसामुळे जिल्ह्यातील सूर्या धरण आणि इतर लघु पाटबंधारे प्रकल्पदेखील काठोकाठ १०० टक्के भरल्याने सिंचनासोबतच पालघर जिल्हा आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना वर्षभर पुरेल इतका पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील सुटला आहे.
सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस
पालघर जिल्ह्यात संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात तब्बल १५०१ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला होता. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी ६७० मिमी पावसाची नोंद होते, मात्र या वर्षी संपूर्ण ऑगस्ट महिन्यात फक्त २०१ मिमी म्हणजेच सरासरी पावसाच्या फक्त ३० टक्के पाऊस पडल्याने शेती धोक्यात येण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्याने जिल्ह्याच्या जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड या डोंगराळ तालुक्यांतील डोंगरउतारावरील पिके धोक्यात आली होती. या भागात सिंचनाच्या फारशा सोयी उपलब्ध नसल्याने शेतकरी फक्त खरीप हंगामातील पिकांवर अवलंबून असतो.
त्यातच बहुतेक सर्व परिसर उंच-सखल टेकडय़ांचा असून अल्पभूधारक असलेला शेतकरी भात, वरी, नाचणी, उडीद यासारख्या पिकांची लागवड करून त्यामधून येणाऱ्या उत्पन्नावर वर्षभर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो. डोंगरउतारावर पावसाचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने शेतजमीन लवकर कोरडी होऊन लागवड केलेली पिके वाळू लागली होती. मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने पुनरागमन केल्याने पिकांना जीवनदान मिळाले आहे. आतापर्यंत सरासरी ४०० मिमी पावसाची समाधानकारक नोंद झाली आहे. सध्या मुसळधार पाऊस न पडता हलका फुलका पाऊस होत असल्याने कुठेही पूरपरिस्थिती निर्माण न होता पिकांच्या वाढीसाठी अगदी योग्य पाऊस होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
मुंबईकरांची चिंता दूर
सप्टेंबर महिन्यात वैतरणा आणि तानसा नदीचे खोरे असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसर, ठाणे जिल्ह्यातील कसारा व पालघरमधील वाडा, मोखाडा तालुक्यांत झालेल्या चांगल्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे तुडुंब भरली आहेत. तानसा २२४.३६ दलघमी, मोडक सागर २५३.८७ दलघमी आणि मध्य वैतरणा २०५.९७४ दलघमी असा या तीन प्रमुख धरणांमध्ये एकूण ६८४.२ दलघमी इतका पाणीसाठा तयार झाला आहे. यामुळे मुंबईकरांना वर्षभर पुरेल इतक्या पिण्याच्या पाण्याची निश्चिंती झाली आहे.