पालघर : पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता प्रभाग रचना कार्यक्रम देण्यात आला आहे. ग्राम विकास विभागाकडील १२ जून रोजीच्या शासन आदेशान्वये पालघर जिल्हा परिषदेसाठी एकूण ५७ निवडणूक विभाग व त्याअंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांसाठी एकूण ११४ निर्वाचक गण निश्चित करून त्याप्रमाणे सदस्य संख्या नेमून दिली आहे.
शासन आदेशातील परिशिष्ट अ नुसार जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणाच्या प्रभाग रचनेकरिता पुढीलप्रमाणे वेळापत्रक दिले आहे
अ) प्रारुप प्रभाग रचना, टप्पा प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्द करणे टप्पा सुरु करण्याचा, संपवण्याचा १४ जुलै असून कार्यवाही जिल्हाधिकारी, पालघर करतील.
ब) हरकती व सूचना तसेच सुनावणी जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करणे २१ जुलै पर्यंत, प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्त यांना प्रस्ताव सादर करणे २८ जुलै पर्यंत कार्यवाही जिल्हाधिकारी, पालघर करतील, प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी देऊन निर्णय देणे ११ ऑगस्ट पर्यंत कार्यवाही विभागीय आयुक्त करतील
क) अंतिम प्रभाग रचना अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे सादर करणे १८ ऑगस्ट पर्यंत, कार्यवाही जिल्हाधिकारी, पालघर करतील.
जिल्हा परिषद निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचनेचे प्रारुप परिशिष्ट (५-अ) व (५-ब) मधील प्रारुप अधिसूचना व अनुसूची तयार करून ती शासन राजपत्रात १४ जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारुप प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर, संबंधित पंचायत समिती कार्यालयाच्या नोटीस बोर्ड व वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारुप प्रभाग रचना १४ जुलै रोजी प्रसिध्द केल्यानंतर त्यावर २१ जुलै पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय,पालघर व संबंधित तहसिलदार यांच्या कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करून विहित रितीने स्विकारण्यात येतील. प्राप्त हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडे ११ ऑगस्ट पर्यंत सुनावणी देऊन निर्णय देण्यात येईल.
त्यानंतर जिल्हाधिकारी,पालघर यांनी पालघर जिल्हा परिषदेचे निवडणूक विभाग व त्याअंतर्गत येणाऱ्या आठही पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणाची रचना अंतिम केल्यानंतर परिशिष्ट (८-अ) व (८-ब) नुसार निवडणूक विभाग व निर्वाचक गण अंतिम अधिसूचना शासन राजपत्रात १८ ऑगस्ट पर्यंत प्रसिध्द करण्यात येईल व त्यास जिल्हाधिकारी,पालघर, तहसिलदार/पंचायत समिती कार्यालयातील सूचना फलक/संकेतस्थळ, स्थानिक वृत्तपत्रे यामध्ये व्यापक प्रसिध्दी देण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रणजित देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.