पालघर : मुंबई कडून अजमेर कडे जाणाऱ्या अजमेर एक्सप्रेस पालघर रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडत असताना विद्युत प्रणालीमध्ये दोष होऊन विद्युत तारा गाडीवर पडल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
ऐन गर्दीच्या वेळी मुंबई कडून गुजरात कडे जाणाऱ्या अनेक जलद गाड्या सायंकाळी सहा ते रात्री आठच्या दरम्यान जात असतात. यावेळी पालघर रेल्वे स्थानकातून सुटलेल्या अजमेर एक्सप्रेस चे काही डबे रेल्वे स्थानकाच्या उत्तरेला असणाऱ्या जुन्या रेल्वे फाटकाच्या पुढे गेले असता विद्युत प्रणाली कोसळल्याने सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.
मुंबईकडून गुजरात कडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या तसेच उपनगरीय सेवा पालघर च्या अलीकडच्या स्थानकांमध्ये थांबून ठेवले असून या दुरुस्तीसाठी काही तासांचा अवधी लागेल अशी शक्यता आहे. हा तांत्रिक बिघाड सायंकाळी ६.४५ च्या सुमारास झाल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर रेल्वेने सायरन वाजवून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सतर्कता केले मात्र यामुळे नागरिकांमध्ये काही ककाळ भीतीचे वातावरण पसरले होते.
या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या मार्गीके वरून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून किमान दोन तास वाहतूक ठप्प राहण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.