scorecardresearch

बीड जिल्ह्यातील देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापासून मुंडे भगिनी पुन्हा दूर

गहिनीनाथगड, भगवानगड या दोन्ही धार्मिक गडांच्या विकासाचा ‘ध्वज’ हाती घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी आपला थेट संपर्क वाढवल्याने बीड जिल्ह्यात नव्याने राजकीय बांधणी सुरू केल्याचे अन्वयार्थ काढले जात आहे.

बीड जिल्ह्यातील देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापासून मुंडे भगिनी पुन्हा दूर
बीड जिल्ह्यातील देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापासून मुंडे भगिनी पुन्हा दूर ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

वसंत मुंडे

बीड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गहिनीनाथगडावर हजेरी लावून विकासाची जबाबदारी स्वीकारल्याचे जाहीर केले. तर न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांच्यासमवेत ‘तर्पण’ च्या कार्यक्रमात भगवानगडाच्याही विकासासाठी सरकार पुढाकार घेईल, असे आश्वासन दिले. व्यसनमुक्ती कार्यक्रमालाही उपस्थिती लावली. बीड जिल्ह्यात पंधरा दिवसातील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमांपासून भाजपच्या सचिव पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे अलिप्त राहिल्या. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी गडांच्या व्यासपीठावरुनच आपला राजकीय प्रभाव राज्यभर वाढवला होता. याच दोन्ही धार्मिक गडांच्या विकासाचा ‘ध्वज’ हाती घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी आपला थेट संपर्क वाढवल्याने जिल्ह्यात नव्याने राजकीय बांधणी सुरू केल्याचे अन्वयार्थ काढले जात आहे.

बीड जिल्ह्यातील गहिनीनाथगड (ता. पाटोदा) येथे संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्याला रविवारी उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. महंत विठ्ठल महाराज यांनी दिलेला ध्वज फडकावून गडाचा सेवेकरी म्हणून जबाबदारी स्वीकारल्याचे जाहीर केले. तर नाथ सांप्रदायातील सर्व नाथांबरोबरच राजकारणात गोपीनाथांचा आशीर्वाद मिळाल्याचे सांगत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलची कृतज्ञताही व्यक्त करून मुंडेंना मानणाऱ्या समुहाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर दरवर्षी गडाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या भाजपच्या सचिव पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे मात्र यावेळी गैरहजर राहिल्या. पंधरा दिवसांपूर्वी दिवंगत विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती कार्यक्रमालाही देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह उपस्थिती लावली. पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्याकडे मुंडे भगिनीसह समर्थकांनीही पाठ फिरवली होती. चार दिवसांपूर्वी मुंबईत भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांच्या तर्पण फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांच्याबरोबर फडणवीस यांनी उपस्थिती लावून महंत शास्त्री संतसाहित्याचे गाढे अभ्यासक असून प्रदीर्घ तपश्चर्येतून त्यांनी भगवानगडाचे महत्त्व वाढवले आहे. मधल्या काळात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता भगवानगडाच्या विकासासाठी सरकार पुढाकार घेईल, असे स्पष्ट केले. लागोपाठ झालेल्या कार्यक्रमापासून मुंडे भगिनी मात्र अलिप्त असल्याने सामाजिक व धार्मिक कार्यक्रमातूनही राजकीय चर्चेला उधाण आले आहे. भाजप अंतर्गत स्पर्धेतूनच फडणवीसांच्या दौऱ्यापासून मुंडे भगिनी दूर राहिल्या की ठेवले, असे कयास बांधले जात आहेत.

हेही वाचा… शिंदे गटाचे भरत गोगावले यांची राष्ट्रवादीकडून कोंडी

गहिनीनाथगड आणि भगवानगडाचा राज्यभर लाखोंचा भक्तगण असल्याने या गडांच्या कार्यक्रमातूनच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी आपला राजकीय प्रभाव निर्माण केला होता. भगवानगडाच्या दसरा मेळाव्यातून कधी ‘दिल्ली’ तर कधी ‘मुंबई’ दिसत असल्याचे सांगत राजकीय दिशा स्पष्ट केल्याने गडांना राजकीय महत्त्व आले. दिवंगत मुंडे यांच्यानंतर दोन्ही गडांचे व्यासपीठ पंकजा मुंडे यांना मिळाले. मात्र परळीत पंकजा यांनी गोपीनाथगड निर्माण केल्यानंतर अंतर्गत वादातून महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगडावर राजकीय भाषण बंदीची घोषणा केली. परिणामी पंकजा यांनी सावरगाव घाट (ता.पाटोदा) येथे नवा भगवान भक्तीगड स्थापन करून दसरा मेळाव्याची परंपरा चालवली. यावरुन ‘राजसत्ता विरुद्ध धर्मसत्ता’ असा संघर्ष धुमसत राहिला. दरम्यान विधानसभा निवडणुकीत पंकजा यांचा पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत नेतृत्वाच्या स्पर्धेत मागच्या तीन वर्षांपासून फडणवीस आणि पंकजा यांच्यातील वाद काही लपून राहिला नाही. पंकजा यांची इच्छा असतानाही विधान परिषदेवर ऐनवेळी दुसऱ्या फळीतील रमेश कराड यांना तर केंद्रात खासदार प्रीतम मुंडे यांची अपेक्षा असताना डॉ. भागवत कराडांना संधी मिळाली. पक्षाकडून मुंडे भगिनींना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप करत समर्थकांनी समाजमाध्यमातून फडणवीसांना लक्ष्य केले. राज्यपातळीवरील पक्षाच्या कार्यक्रमापासून तसेच केंद्रीय नेत्यांच्या दौऱ्यात पंकजा यांचा समावेश नसतो. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या बातम्या माध्यमातून चर्चिल्या जातात आणि पक्षाचे नेते खुलासे करून मोकळे होतात. प्रत्यक्षात मात्र पक्षपातळीवर त्यांचा फारसा वावर दिसत नसल्याने नेमके भाजपात काय चालले आहे, याचीच चर्चा होत राहते.

हेही वाचा… जालन्यात राष्ट्रवादीच्या वर्चस्वपट्ट्यात भाजपचे लक्ष!

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेत्यांकडून पंकजा यांच्या प्रवेशाबाबत जाहीर व्यक्त केल्यानंतर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच पंकजा मोठ्या नेत्या असून भाजपचे घर सोडून कोठेही जाणार नाहीत, असे स्पष्टीकरण दिले होते. प्रत्यक्षात मात्र फडणवीसांनी जिल्ह्यात येऊन जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावली तरी पंकजा सामील झाल्या नसल्याने दोघांतील वाद ठळकपणे मानला जातो. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनाही पक्षांतर्गत संघर्षाला सामोर जावे लागले होते. मात्र, मुंडेंच्या बालेकिल्ल्यात पक्षाच्या नेत्यांनी स्वतंत्रपणे कार्यक्रमाला येण्याची हिंमत केली नव्हती. पहिल्यांदाच मागील पंधरा दिवसात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंडे भगिनींना वगळूनच त्यांच्या प्रभाव क्षेत्रात कार्यक्रमांना हजेरी लावून आपला थेट संपर्क वाढवला आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षांतर्गत स्पर्धेतून नेमके काय राजकीय डावपेच खेळले जातात आणि यावर मुंडे भगिनी कशा पद्धतीने मात करतात, याची उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 13:11 IST

संबंधित बातम्या