सौरभ कुलश्रेष्ठ

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष या नात्याने  मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियान’ सुरू करत पक्षाचे मुंबईत पुनरुज्जीवन करण्यासाठी हालचाल सुरू केली आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी जाहीर सभा घेत हिंदुत्वाची भूमिका घेतली. मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलनाची हाक दिली. मात्र त्या आंदोलनाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्याचबरोबर राज ठाकरे यांना आपला अयोध्या दौराही रद्द करावा लागला.  सध्या आजारपणामुळे राज ठाकरे यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे पुन्हा शांत झाल्याचे चित्र निर्माण झाले. हे राजकीय चित्र बदलण्यासाठी व मनसे पदाधिकाऱ्यांना सक्रिय करण्यासाठी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे वडिलांच्या मदतीला आले आहेत. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात पोहोचण्याचे लक्ष्य ठेवत त्यांनी दौरे-बैठका सुरू केल्या आहेत.

अमित ठाकरे यांनी मनविसेची पुनर्बांधणी करण्याच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांत वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, विलेपार्ले, कलिना, चांदिवली, कुर्ला, मुंबादेवी, भायखळा, दहिसर, मागाठाणे, बोरिवली, चारकोप, कांदिवली पूर्व, मालाड अशा भागांत एकानंतर एक बैठका घेतल्या. विधानसभा मतदारसंघातील मनसे पक्ष कार्यालयांत तरुण तरुणींशी संवाद साधला. प्रत्येक विभागात अमित ठाकरे विद्यार्थी विद्यार्थिनीशी किमान दीड-दोन तास संवाद साधतात. व्यक्तिशः आणि गटागटाने विद्यार्थ्यांशी अमित संवाद साधतात. मनविसेच्या जुन्या तसेच विद्यमान पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना सक्रीय करण्यावर भर देण्यात येत आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची पुनर्बांधणी करताना प्रत्येक महाविद्यालयात मनविसेची विद्यार्थी कार्यकारिणी (स्टुडंट्स युनिट) स्थापन करण्यावर अमित ठाकरे यांनी भर दिला आहे. गेल्या काही दिवसांत अमित ठाकरे यांनी मुंबईतील २१ विधानसभा मतदारासंघातील सुमारे चार हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधत महाविद्यालयात मनविसे सक्रीय करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.