पुणे/ इंदापूर: महायुतीमधील कोणीही माझ्याशी बोलण्यास तयार नाही. महायुतीतील नेत्यांना माझी अडचण वाटत असेल तर त्यांनी तसे सांगावे, असे सांगत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लवकरच ‘निर्णय’ घेणार असल्याचे जाहीर केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरमधून विद्यामान आमदारांना संधी देण्याचे संकेत दिले असल्याने महायुतीचे जागा वाटप झाले का, अशी विचारणा पक्षाच्या नेत्यांकडे करणार असल्याचे स्पष्ट करत निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

इंदापूरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्याची शक्यता असल्याने पाटील नाराज आहेत. त्यामुळे ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बावडा येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका करत नाराजी व्यक्त केली. सर्व गोष्टी सहन केल्या जातील. मात्र, अपमान सहन करणार नाही, असा इशारा देत निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे त्यांनी जाहीर केले. पाटील म्हणाले की, आम्ही महायुतीचे घटक आहोत. मात्र त्यानंतरही अजित पवार यांनी विद्यामान आमदारांना संधी देण्याचे संकेत दिले. त्यामुळे महायुतीचे जागा वाटप झाले का? अशी विचारणा पक्षाच्या नेत्यांकडे करणार आहे. महायुतीमधील कोणीही माझ्याशी बोलण्यास तयार नाही. विधानसभा निवडणूक आली की आमचे काय चुकते, याचा भाजप नेतृत्वाने विचार करावा. महायुतीतील नेत्यांना माझी अडचण वाटत असेल तर त्यांनी तसे सांगावे. मी अद्यापही कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र जनतेच्या मनात काय आहे, हे पाहून निर्णय घेतला जाईल. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांची जनसन्मान यात्रा इंदापूरमध्ये आली आणि त्यावेळी विद्यामान आमदारांना पुन्हा संधी देण्याचे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीमध्ये असूनही शासकीय कार्यक्रमात डावलण्यात येते, अशा शब्दांत पाटील यांनी अजित पवार यांच्याबाबतची नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा :RSS Annual Meeting: संघाची गरज नाही म्हणणारे जेपी नड्डा RSS च्या बैठकीला उपस्थित राहणार; ‘हे’ आहेत महत्त्वाचे मुद्दे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीस, बावनकुळे यांची भेट घेणार

भाजपमधून बाहेर पडण्याचा कोणताही निर्णय घेतला नसताना पक्षाच्या नेत्यांनी काही विधाने केली. ती का केली, हे मला समजले नाही. मी अपक्ष म्हणून किंवा दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या भावना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना लवकरच कळविण्यात येतील आणि तसा निर्णय जाहीर केला जाईल. याबाबत फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेणार आहे. कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे, हे मला माहिती आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.