BJP MPs Walk Out Of Parliamentary Panel Meet ग्रामीण विकास आणि पंचायती राज विभागाशी संबंधित स्थायी समितीची बैठक मंगळवारी (१ जुलै) बोलावण्यात आली होती. सकाळी संसदेत काँग्रेस खासदार सप्तगिरी शंकर उलका यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, या बैठकीदरम्यान मोठा गदारोळ निर्माण झाला. मुख्य म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या उपस्थितीवरून बैठकीला उपस्थित असणारे भाजपा खासदार संतापले. संसदीय समितीत नक्की काय घडले? मेधा पाटकर आणि प्रकाश राज यांच्या उपस्थितीवरून वाद का निर्माण झाला? त्याविषयी जाणून घेऊ…
संसदीय समितीच्या बैठकीत गदारोळ निर्माण होण्याचे कारण काय?
- संसदीय समितीच्या या बैठकीत जमीन संसाधन विभाग आणि पंचायती राज मंत्रालयाने केलेल्या सरकारी कामांवरील दोन मसुदा अहवालांवर चर्चा करण्यात येणार होती.
- त्यात जमीन संपादन, पुनर्वसन, पुनर्वसनात योग्य भरपाई आणि पारदर्शकतेचा अधिकार कायदा, २०१३ लागू करण्याबाबत चर्चा करण्यात येणार होती.
- या बैठकीत विविध मंत्रालये, स्वयंसेवी संस्थांमधून साक्षीदारांना बोलावण्यात आले होते.
- जेव्हा भाजपा खासदारांना कळले की, या बैठकीत मेधा पाटकर आणि अभिनेते-कार्यकर्ते प्रकाश राज सहभागी झाले आहेत, तेव्हा तणाव निर्माण झाला. अनेक भाजपा खासदारांनी यावर तीव्र आक्षेप घेतला.

त्यांनी आरोप केला की, सहभागी व्यक्तींचे नाव आधी उघड करण्यात आले नव्हते. त्यांनी असाही आरोप केला की, सरकारवर टीका करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अशा व्यक्तींचा समावेश राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि चर्चेसाठी अयोग्य आहे. भाजपा खासदार पुरुषोत्तम रूपाला यांनी सर्वांत आधी आपला निषेध नोंदवला. त्यांनी म्हटले की, मेधा पाटकर यांनी राष्ट्रीय विकासात्मक उपक्रमांना, विशेषतः गुजरातच्या जलसंपत्तीसाठी महत्त्वाच्या प्रकल्पांना गेल्या काही काळापासून विरोध केला आहे. ते म्हणाले, “समितीसमोर अशा बाबींवर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. जर हे त्यांच्या हातात असते,तर अर्धा गुजरात दुष्काळग्रस्त झाला असता,” असेही ते म्हणाले.
पुरुषोत्तम रूपाला यांच्या या भूमिकेला भाजपा खासदार डॉ. संजय जयस्वाल (बिहार), राजू बिस्ता (पश्चिम बंगाल) व जुगल किशोर (जम्मू) यांनी पाठिंबा दिला. सदस्यांनी साक्षीदारांच्या यादीत पारदर्शकता असावी, अशी मागणीही केली आणि अध्यक्षांनी नावे लपवल्याबद्दल टीका केली. त्यांनी असेही सांगितले की, साक्षीदारांच्या यादीची प्रत फक्त संजय जयस्वाल यांना मिळाली होती. चौकशी करूनही, प्रकाश राज बैठकीच्या खोलीबाहेर का उपस्थित होते, हे स्पष्ट झाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. सदस्यांना दिलेल्या कोणत्याही अधिकृत यादीत त्यांचे नाव नव्हते. बैठक सुरू झाल्यानंतर अध्यक्षांनी दोघांनाही आमंत्रित करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांची परवानगी घेतल्याचे सदस्यांना कळवले आणि त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. सत्ताधारी भाजपाच्या खासदारांनी या दाव्याला आव्हान दिले. त्यांनी असा दावा केला की, लोकसभा अध्यक्षांकडून याप्रकारची कोणतीही मान्यता देण्यात आली नाही.
भाजपावर काँग्रेसचा आरोप
काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद व इम्रान मसूद यांनी अध्यक्षांना पाठिंबा दिला आणि भाजपावर या मुद्द्याचे राजकारण करण्याचा आरोप केला. ‘सीएनएन-न्यूज१८’शी बोलताना डॉ. संजय जयस्वाल म्हणाले, “संसदीय कामकाजाच्या इतिहासात कोण आणि का उपस्थित राहते याबद्दल सदस्यांना अंधारात ठेवल्याचे आपण कधीही पाहिले नाही. मेधा पाटकर यांच्याविरोधात केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून सुमारे ४५ ते ५० खटले सुरू आहेत. अशी व्यक्ती संसदीय पॅनेलसमोर सार्वजनिक हिताचे प्रतिनिधित्व कसे करू शकते?”
समितीतील एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘सीएनएन-न्यूज१८’ला सांगितले, “अध्यक्ष सामान्यतः निष्पक्ष आणि मृदुभाषी असतात, ती त्यांची ओळख असते. परंतु, असे दिसते की अध्यक्षांवर त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा दबाव होता. मेधा पाटकर यांच्यासारख्या प्रसिद्ध गांधी कुटुंबसमर्थक असलेल्यांना बोलावल्याने चुकीचा संदेश जातो.” अध्यक्षांनी १० स्वयंसेवी संस्थांमधील प्रतिनिधींची साक्ष घेऊन, पुढे जाण्याचा आग्रह धरल्यानंतर भाजपा खासदारांनी सभात्याग केला. त्यामुळे तणाव आणखीनच वाढला. भाजपा खासदारांनी सभात्याग केल्यानंतर बैठकही स्थगित करण्यात आली.