देशभरात विविध ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार इनकमिंग चालू आहे. इतर पक्षांमधून भाजपामध्ये जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर त्यातल्या उमेदवारी जाहीर होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. त्यामुळे भाजपातील निष्ठावंतांमध्ये नाराजीच्या चर्चा एकीकडे जोर धरू लागलेल्या असताना दुसरीकडे गुजरात भाजपामध्ये मात्र उलटंच चित्र दिसत आहे. भाजपाचं तिकीट जाहीर झालेल्या दोन नेत्यांनी अवघ्या दोन ते तीन दिवसांतच हे तिकीट नाकारलं आहे! त्यामुळे असंख्य इच्छुक रांगेत असताना भाजपाच्याच दोन नेत्यांनी मिळालेलं तिकीट नाकारल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मोदी-शाहांच्या गृहराज्यात नेमकं घडतंय काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं गृहराज्य असणाऱ्या गुजरातमध्ये जवळपास तीन दशकांपासून भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपाचं तिकीट मिळण्यासाठी पक्षासोबतच इतर मित्रपक्ष व पक्षात येऊ इच्छिणारे संभाव्य उमेदवार यांच्यात कायमच चढाओढ असते. त्यातूनही तिकीट जाहीर झालेल्या उमेवारांच्या मागे पक्ष उभा असल्यामुळे त्यांच्यासाठी निवडणुकीचं गणित जुळवणं तुलनेनं सोपं होतं असं मानलं जातं. अशा स्थितीत भारतीय जनता पक्षाचं मिळालेलं तिकीट कुणी नाकारू शकेल यावर जरी कुणाला विश्वास बसत नसला, तरी हे घडलं आहे आणि तेही मोदी-शाहांच्या गृहराज्यात!

गेल्या काही दिवसांत गुजरातमध्ये आधी रंजना भट्ट आणि त्यांच्यापाठोपाठ भिखाभाई ठाकोर या दोन उमेदवारांनी त्यांना मिळालेली पक्षाची उमेदवारी नाकारली आहे. २००० साली महानगर पालिका निवडणुकीत पक्षाविरोधात बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या आणि मोओठ्या फरकाने जिंकून येणाऱ्या रंजना भट्ट यांनी २३ मार्च रोजी पक्षानं देऊ केलेली उमेदवारी नाकाकरली. त्यांच्या उमेदवारीला झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

चालून आलेली मोठी संधी नाकारली!

५६ वर्षीय भिखाभाई ठाकोर यांचा निर्णय तर त्याहून आश्चर्यकारक होता. गेल्या २७ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत तालुका स्तरावरून फक्त जिल्हा स्तरापर्यंत पोहोचलेल्या ठाकोर यांना थेट राष्ट्रीय पातळीवर जाण्याची चालून आलेली संधी त्यांनी नाकारली. काही दिवसांपूर्वीच वडोदऱ्यातल्या सावलीमधील भाजपा आमदार केतन इनामदार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. हा त्यांनी काही तासांत जरी मागे घेतला असला, तरी ही आपली आमदारकीची शेवटची टर्म असेल, असं त्यांनी जाहीर करून टाकलं!

गोव्यात पहिल्यांदाच भाजपाच्या तिकिटावर महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत पल्लवी डेम्पो?

गुजरातमध्ये भाजपामधील घडामोडींबाबत उघड नाराजी नसली, तरी अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे त्याबाबत आपल्या कृतीच्या माध्यमातून सूतोवाच करण्याचे प्रसंग तसे विरळाच! त्यातही इतक्या वेगाने या गोष्टी घडत असताना तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

एका रात्रीत रंजना भट्ट यांनी निर्णय बदलला?

२२ मार्च रोजी रात्री रंजना भट्ट यांनी मंजलपूर भागात मोठ्या गर्दीसमोर प्रचारसभा घेऊन मतदान करण्याचं आवाहन केलं. पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याची घोषणा झाली! कार्यकर्त्यांच्या गर्दीत बसलेल्या भट्ट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्वाभिमान आणि रोजच्या आरोपांना कंटाळल्याचं त्या सांगत होत्या. यावेळी त्यांना भावनिक झाल्याचं त्यांचे मतदार पाहात होते! विशेष म्हणजे यावेळी वडोदरातील स्थानिक भाजपा पदाधिकारी मात्र त्या सगळ्या घडामोडींमध्ये गैरहजर होते!

नाट्यमय राजकीय कारकीर्द!

रंजना भट्ट यांची कारकिर्द मोठी नाट्यमय राहिली. ९० च्या दशकात त्यांनी भाजपात प्रवेश केला. २००० साली पक्षाविरुद्ध बंडखोरी करून पालिका निवडणुका लढवल्या आणि त्या जिंकल्याही. त्यानंतर पक्षात त्यांनी विविध पदं भूषवली.२०१४ साली पंतप्रधान मोदी वाराणसी व वडोदरा अशा दोन्ही जागांवरून जिंकून आले आणि त्यांनी वडोदराची जागा सोडली. तेव्हा भट्ट तिथे पोटनिवडणुकीत उभ्या राहिल्या आणि तब्बल ५ लाख मताधिक्याने जिंकून आल्या. २०१९मध्येही विजयाची पुनरावृत्ती झाल्यानंतर आताही पक्षानं त्यांना तिकीट दिलं. पण त्यांना पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागला.

मुरली मनोहर जोशींचं तिकीट कापणाऱ्या नेत्याची लोकसभा निवडणुकीतून माघार, नेमकं कारण काय?

पक्षाच्या ज्येष्ठ महिला नेत्या ज्योती पंड्या यांनीच भट्ट यांना विरोध केला. “माझ्या उमेदवारीची घोषणा झाल्यापासून दररोज माझ्यावर आरोप होत आहेत. माझ्या मुलावर ऑस्ट्रेलियात मॉल बांधल्याचा आरोप केला जातोय. त्याच्या नावावर एक साधं दुकानही नाहीये. मला माझा स्वाभिमान आहे. त्यामुळे या रोजच्या चुकीच्या आरोपांना पूर्णविराम द्यायचं मी ठरवलं. सकाळी देवासमोर केलेल्या प्रार्थनेदरम्यान माझा हा निश्चय झाला”, असं भट्ट म्हणाल्या!

भिखाभाई ठाकोर यांचा ‘वैयक्तिक’ निर्णय!

९०च्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनात सक्रीय सहभाग असणारे भिखाभाई ठाकोर ९०च्या दशका विश्वहिंदू परिषदेचे सक्रीय कार्यकर्ते होते. १९९८ साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. २००५ पर्यंत ते साबरकंठा जिल्ह्याचे भाजपा ओबीसी मोर्चाचे महामंत्री झाले होते. सध्या ते अरावली जिल्ह्याचे जनरल सेक्रेटरी आणि सारकंठा जिल्हा सहकारी बँकेचे उपसंचालक आहेत. त्याव्यतिरिक्त त्यांच्यावर पक्षाच्या इतरही काही जबाबदाऱ्या आहेत. ठाकोर यांची ही पहिलीच राष्ट्रीय निवडणूक होती. पण तरीही रस्त्यावर उतरून काम आणि प्रचार करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे त्यांची ख्याती सर्वदूर पोहोचली होती.

आडनावाचा वाद कारणीभूत?

ठाकोर यांनी २०१८मध्ये त्यांचं आडनाव दामोर बदलून ठाकोर करून घेतलं. त्यावरून वाद झाल्यामुळेच उमेदवारी मागे घेतल्याची चर्चा आहे. पण खुद्द ठाकोर यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. “माझी जात दामोर असली तरी माझी उपजात हिंदू ठाकरडा आहे. त्यामुळे मी कायदेशीर मार्गाने हा बदल करून घेतला आहे. मला कळत नाही की लोक यावरून का वाद घालत आहेत”, असं म्हणत उमेदवारी मागे घेणं हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय असल्याचं ठाकोर यांनी ठामपणे म्हटलं आहे. “मी अजूनही पक्षाच्या कामात सहभागी आहे आणि माझ्यावर टाकलेल्या जबाबदाऱ्या यापुढेही पार पाडत राहीन”, असं ठाकोर सांगतात!