छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांना मराठवाड्यातील तरुणांनी नायक केले. आरक्षण आंदोलनात ‘ विजयी ’ झाल्याचे सांगत हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा निर्णय झाला आणि मराठवाड्यात धनगर समाजाने अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी तसेच मोठे आंदोलन जालना येथे उभे केले.

गेल्या १६ दिवसासून दीपक बोऱ्हाडे उपोषणास बदले आहेत. तेही आता ‘ नायक’ ठरवले जाऊ लागले आहेत. काही दिवसापूर्वी बंजारा समाजाने मोठे आंदोलन उभे केले. आता महादेव कोळी, परीट तसेच अन्य जातीतून एकेक नवे ‘ जरांगे ’ उभे ठाकू लागले आहेत. सर्वाांच्या मागण्या आरक्षण प्रवर्ग बदलण्याच्या असल्याने ऐन अतिवृष्टीच्या संकटातही ‘ ज्याचे – त्याचे जरांगे ’ अशी नवी सामाजिक रचना राजकीय कारणांसाठी उभी राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

बिनतोड युक्तिवाद करत आपल्या मागणीच्या पुष्ठ्यार्थ बाजू मांडणारे दीपक बोऱ्हाडे म्हणाले, परभणीमध्ये गंगाखेड नावाचे गाव आहे. त्याचे रेल्वे स्टेशनवरचे ‘ स्पेलिंग ’ वाचले की त्याचा उच्चार ‘गंगाखेर’ होतो. ‘धनगड’ आणि ‘ धनगर’ यातही तसेच साम्य आहे. धनगड नावाची जातच नाही. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या ४७ जातीच्या यादींच्यातील ३७ वी ‘ धनगड’ अशी नोंद धनगर याच जातीची आहे. त्यामुळे धनगर समाजाला आदिवासी समजून आरक्षण बदलून द्यावे अशी आमची मागणी आहे.’ ही मागणी आताच का केली जात आहे, या प्रश्नावर बोलताना बोऱ्हाडे म्हणतात, ही मागणी जुनी आहे. १९८० पासून बारामतीचे बी. के. कोकाटे यांनी प्रयत्न केले.

२०१४ पासून ही मागणी लाऊन धरण्यासाठी आंदोलन केले जात होते. मंत्रालयातून उड्यामारण्यापासून ते विविध ठिकाणी उपोषण केले असल्याचे बोऱ्हाडे सांगतात. पोलीस म्हणून नोकरी करणारे बोऱ्हाडे यांनी नोकरी सोडून २०१४ पासून स्वत: आंदोलनात उतरले. त्यांच्या उपोषणाचा आजचा १६ दिवस होता. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे.

पण आदेश मिळेपर्यंत आपण मागे हटणार नाही असे ते म्हणाले. बोऱ्हाडे यांच्या आंदोलनासही मोठा प्रतिसाद मिळतो आहे. आरक्षण आंदोलनातील जालन्यातील गर्दी आता वाढत आहे. असे आरक्षण देण्यात बारामती, माढा या मतदारसंघातून सुप्त विरोध असल्याचे आंदोलकांचे मत आहे. हे मतदारसंघ ‘ लोकसंख्ये’ च्या निकषावर अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले तर ही सुप्त भीती या मतदारसंघातील बड्या पुढाऱ्यांना आहे.

धनगर समाजाबरोबरच अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश व्हावा म्हणून बंजारा समाजाने आंदोलन हाती घेतले आहे. राज्यभर त्याचे मोर्चे, उपोषण सुरू झाले आहे. युक्तिवाद काय आहे तर तांड्यावर राहणाऱ्या या समाजाचे वेगवेगळया राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात आरक्षण आहे. प्रवाहाच्या बाहेर फेकल्या गेलेल्या हा समुदाय कृषक नव्हता.भटक्या समाजातील हा आरक्षण लढा तसा १९८० पासूनचा. मुख्यमंत्री पदी वसंतराव नाईक असताना या लढ्याला बळ मिळाले.

अनुसूचित जमातीमध्ये पात्र असल्याने सर्वत्र एकाच सूचीत टाकावे अशी मागणी केली जाते आहे. या मागणीचेही उपोषण जालना येथे झाले. राज्यभर आंदोलने सुरू असताना बंजारा आणि वंजारा – वंजारी एकच असे विधान धनंजय मुंडे यांनी केले. त्यामुळे बराच वाद झाला. तेव्हा प्रश्न विचारला गेला ‘ वंजारा आणि बंजारा जातीमध्ये ‘बेटी व्यवहार’ आहे का ? पुढे दबाव वाढला आणि धनंजय मुंडे यांनी ‘ माझ्या म्हणण्याचा अर्थ वेगळा काढला गेला असे म्हटले. निमित्ताने समाज म्हणून कोणाचे नाव फारसे पुढे न करता एक आंदोलन अजूनही धगधगते आहे.

ओबीसी आरक्षणात येणाऱ्या कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा निर्णय होण्यापूर्वी ‘ ओबीसी’ नेत्यांमध्ये प्रा. लक्ष्मण हाके आणि नागनाथ वाघमारे यांचे नेतृत्व पुढे आले. पण मराठा समाजाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे हे मात्र मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करत होते. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यावरही टीका होत. पण टीकेच्या केंद्रस्थानी छगन भुजबळ होते. त्यामुळे ओबीसी – मराठा आंदोलनात नायक आणि खलनायक अशी ‘ आरक्षण वाटणी पूर्ण झाली.

हैदराबाद गॅझेटिअर लागू झाले आणि महादेव काेळी यांचेही आंदोलन सुरू झाले. त्यात कोणी ‘ जरांगे ’ सारखे नेते उभे राहिले नाही. पण मोर्चे, सुरू राहिले. १९२१ च्या जनगणनेमध्ये मराठवाड्यामध्ये दोनच जमाती आढळतात असे नमूद केले आहे. आदिवासी क्षेत्रातील महादेव कोळी, म्हल्हार कोळी यांच्या जुन्या नोंदी या केवळ ‘ कोळी’ अशा आहेत.

उदाहरणार्थ, दिवंगत माजी मंत्री मधुकर पिचड आणि गोविंद गारे यांच्या जातदाखल्यावर ‘ कोळी’ एवढीच होती. पण त्यांना ‘ महादेव कोळी’ हे वैधता प्रमाणपत्र देण्यात आले होते, असा दावा सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ कोल्हे यांनी केला. याच निकषाच्या आधारे जात व वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. या पूर्वी सभागृहामध्ये आदीवासी मंत्री विजय गावीत यांनी या प्रश्नी सभागृहात सकारात्मक उत्तर दिले होते.

हैदराबाद गॅझेटिअर लागू झाल्यावर कोळ्यांच्या अनेक उपजाती असल्या तरी राज्यात महादेव कोळी आणि मल्हार कोळी या दोनच जाती आहेत. त्यामुळे आदीवासी जमातीतील निकष मराठवाड्यातही पाळा अशी मागणी जोर धरू लागली. कुटुंबामध्ये जर जात वैधता प्रमाणपत्र असेल तर कुटुंबातील सदस्यांना विनाअट जात प्रमाणपत्र मिळावे अशा मागण्यांसाठी आंदोलने सुरू झाली आहेत. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे या अनुषंगाने मोठे आंदोलन झाले.

आता परीट समाजाचे आंदोलनही सुरू झाले आहे. या जातीचे आरक्षण १८ राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गात आहे आणि १२ राज्यात ओबीसी प्रवर्गात आहे. हा दूजाभाव दूर करा, अशी मागणी घेऊन तेही आंदोलन सुरू झाले आहे. या प्रत्येक आंदोलनाचा एक नेता आता पुढे येतो आहे. काही जातीचे नेतृत्व सामुहिक असले तरी आरक्षण मागणीसाठी एका पाठोपाठ एक ‘ जरांगे ’ तयार होत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या सर्व आंदोलनाचा परिणाम होईल, असे सांगितले जात आहेत.