भारत राष्ट्र समितीचे ( पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती ) सर्वेसर्वा आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव २०२४ साली होणाऱ्या लोकसभेसाठी तयारी करत आहेत. त्यासाठी केसीआर हे तिसऱ्या आघाडीची मोट बांधत आहेत. अशातच आता केसीआर यांनी भाजपावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे. धार्मिक आणि जातीय कट्टरतेला प्रोत्साहन दिल्यास समाजात उभी फूट पडून नरक बनेल. तसेच, भारतात अफगाणिस्तानप्रमाणे तालिबानसारखी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे तरुणांनी सतर्क रहावे, असा सल्ला केसीआर यांनी दिला आहे.

महबूबाबाद आणि कोठागुडेम येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचं मुख्यमंत्री केसीआर यांनी उद्घाटन केलं. त्यानंतर संबोधित करताना केसीआर म्हणाले, “केंद्रात पुरोगामी विचारांचे आणि निप:क्षपाती सरकार असेल तर देश, राज्य प्रगती करू शकेल. केंद्राने राज्य सरकारला मदत न केल्याने तेलंगणाचे सकल उत्पादन ( जीडीपी ) वाढले नाही,” असा आरोप केसीआर यांनी केला.

हेही वाचा : “संसद नव्हे तर संविधान सर्वोच्च”, उपराष्ट्रपतींच्या विधानावर पी चिदंबरम यांची प्रतिक्रिया

“तेलंगणाची निर्मिती २०१४ साली झाली, तेव्हा राज्याचा जीएसडीपी ५ लाख कोटी रुपये होता. तो सध्या १४.५० लाख कोटी असायला हवा होता. पण, आता ११.५ लाख कोटी राज्याचा जीएसडीपी आहे. केंद्राच्या अकार्यक्षम धोरणांमुळे तेलंगणाला ३ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. ही आकडेवारी अर्थतज्ज्ञ, आरबीआय आणि कॅगने दिली,” असा दावा केसीआर यांनी केला.

“देशाची अवस्था तालिबानसारखी झाली, तर गुंतवणूक येईल का? नोकऱ्या मिळतील का? सध्याचं उद्योगधंदे राहतील का? देशात अशांतता निर्माण होत, लाठीचार्ज आणि गोळीबारसारखे वातावरण निर्माण झाले, तर समाज कसा राहणार? देशाला चुकीच्या मार्गावर नेण्याचं प्रयत्न होत आहेत,” असेही केसीआर यांनी सांगितलं.

हेही वाचा : “…तर स्वातंत्र्य मिळायला आणखी काही दशके लागली असती” अमित शाहांचे विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“देशात पाणी आणि विजेची संसाधने उपलब्ध आहेत. तरी, केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्या-राज्यात पाण्यावरून वाद सुरु आहे. दिल्लीतही पिण्याचे पाणी आणि विजेचा पुरवठा सुरळीत होत नाही, हे लज्जास्पद आहे. असे असतानाही मोठी-मोठी भाषणे केली जातात,” असा टोला केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षपणे लगावला.