केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी माजी मंत्री, आमदार प्रकाश आवाडे यांची भाजपशी जवळीक आणखी एक पाऊल पुढे गेली. आवाडे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा बातम्याही झळकल्या. आवाडे कुटुंबीयांनी अमित शहा यांचा भाजपच्या मंचावर सत्कार घडवून आणला. इतके सारे झाल्यानंतरही आवाडे यांचा भाजपचा अधिकृत प्रवेश कधी याची चर्चा मात्र रंगतच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांच्या पीएला ईडीचे समन्स; उत्पादन शुल्क घोटाळ्याची होणार चौकशी

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आवाडे यांची राजकीय वाटचाल बदलली. इचलकरंजी महापालिका क्षेत्रातील क्षेत्रात आवाडे यांचे राजकीय, सहकार, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रात मोठे काम आहे. गेली ५० वर्षाहून अधिक काळ आवाडे कुटुंबातील तिन्ही पिढ्याने काँग्रेस पक्षाचे काम हिरीरीने केले. कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी इचलकरंजी नगरपालिकेचे नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, उद्योग व नगर विकास राज्यमंत्री, दोन वेळा खासदार असा राजकीय चढता प्रवास पाच दशके केला तो काँग्रेसचा झेंडे हाती घेऊन. त्यांचा राजकीय वारसा चालवत प्रकाश आवाडे १९८५ साली प्रथम विधानसभेवर निवडून गेले. पहिल्याच प्रयत्नात ते सहकार, वस्त्रोद्योग राज्यमंत्री झाले. त्यांनी आतापर्यंत विधानसभा निवडणुकीत पाच वेळा विजय मिळवला तर तीन वेळा पराभवाला सामोरे जावे लागले. वस्त्रोद्योग मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय ठरले. त्यांची दोन्ही मुले स्वप्नील हे बँक, सूतगिरणीचे अध्यक्ष आहेत तर राहुल हे जिल्हा परिषदेचे सदस्य, साखर कारखाना केन कमिटी चेअरमन राहिले. त्यांच्या स्नुषा वैशाली या संघ परिवाराच्या महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या उपाध्यक्ष आहेत.

हेही वाचा- राधाकृष्ण विखे-पाटील यांना भाजपचे बळ

भाजपशी जवळीक

गेल्या विधानसभा निवडणुकी वेळी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीमाना देवून प्रकाश आवाडे यांनी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून अपक्ष निवडणूक लढवली. विजय मिळवल्यानंतर त्यांनी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर आवाडे यांची भाजपशी सलगी वाढतच राहिली. गेल्या काही महिन्यांपासून आवाडे यांनी नरेंद्र मोदी, भाजप असा उच्चार चालू ठेवत भाजपशी निष्ठा वाहायला सुरुवात केली आहे. इचलकरंजी महापालिका निवडणूक कमळ चिन्हावर लढण्याचा इरादाही त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा- रायपूर अधिवेशनात काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीचा संभ्रम कायम

प्रवेशाचा मुहूर्त कोणता?

इतके होत असताना आवाडे यांचा भाजप प्रवेश चर्चेत आला. मात्र, तो कधी होणार यावरून मतांतरे व्यक्त होत राहिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरून पुन्हा एकदा आवाडे यांच्या भाजप प्रवेशाला धुमारे फुटले. भाजपच्या कोल्हापुरातील सभेवेळी मंचावर प्रकाश आवाडे यांची उपस्थिती पाहून ते भाजपात प्रवेश करणार अशी अटकळ बांधली गेली. माध्यमात, समाज माध्यमात आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश असे वृत्तही येत राहिले. या सभेतच प्रकाश आवाडे, राहुल आवाडे, मौश्मी राहुल आवाडे यांनी अमित शहा यांचा सत्कार केला. आवाडे भाजपच्या मंचावर गेले असले तरी त्यांचा प्रवेश अजूनही झालेला नाही. तो कधी होणार यावर प्रश्नचिन्ह आहे. भाजपच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी आवाडे यांचा प्रवेश होईल असे संकेत आहेत. अलीकडे भाजपमध्ये असल्याप्रमाणे आवाडे यांचे राजकीय वावर सुरू राहिला आहे. आता ते भाजपच्या सभेच्या मंचावरही वावरताना दिसू लागले आहे. तर, इचलकरंजीतील भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासोबतही ते अलीकडे सतत दिसले आहेत. त्यावरूनही समाज माध्यमांमध्ये वेगवेगळी चर्चा होत राहिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discussion about when mla prakash awade will be admitted despite his closeness to bjp print politics news dpj
First published on: 23-02-2023 at 15:22 IST