सांगली : भाजप नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष यांच्यातील राजकीय संघर्ष आता टोकाचा झाला असून खंडेनवमीच्या मुहूर्तावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जेष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर जोरदार शाब्दिक बाण सोडले. आता यावर आमदार पाटील यांच्याकडून कसा प्रति हल्ला होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.
मुळात आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार पाटील यांच्यातील सुरू झालेले वाक्युध्द आता पक्षिय पातळीवर पोहचले असून यातून जिल्हा बँक, वाशी बाजार समिती, ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या आणि लॉटरी घोटाळा यावर केंद्रित झाले आहे. पालक मंत्री पाटील यांना खरेच या घटनांची तड लावायची असती तर मधली महाविकास आघाडीची अडीच वर्षे सोडली तर त्यांचीच सत्ता आहे. मग या कालावधीत या गोष्टी चर्चेत का आणल्या नाहीत हा महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित होत आहे.
आमदार पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष तसा जुनाच आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी आटपाडीमध्ये एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न झाला. विधानसभा निवडणुकीसाठी सुरक्षित मतदार संघ म्हणून पडळकर यांनी जतला पसंती दिली. निवडणूक लढवून त्यांनी तब्बल ४० हजार मताधिक्याने ही निवडणूक जिंकलीही. मात्र, पडळकर यांनी जेव्हा संधी मिळेल तेव्हा आमदार पाटील यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही.
विकास आघाडी सरकारच्या काळात पडळकर यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक चोरीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप आहे. यातूनच हा संघर्ष राजकीय पातळीवरचा की वैयक्तिक पातळीवरचा हा खरा प्रश्न आहे. यातूनच त्यांना मंगळसूत्र चोर असल्याचा ठपका ठेवण्यात राष्ट्रवादीचे नेते पुढे असतात. विधान भवनातही अधिवेशन काळात यातूनच अभूतपूर्व मारामारीची घटना घडली होती.
जतमध्ये एका कनिष्ठ अभियंत्याने आत्महत्या केली. आमदार पडळकर यांच्या एका सहकार्याच्या जाचाने त्याने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. यातून आमदार पडळकर यांनी बदनामीच्या निषेधार्थ मोर्चा काढून आमदार पाटील यांच्या मातेविषयी अवमानकारक वक्तव्य केले. हे कुणालाच पटणारे नाही.
तरीही हा वाद इथंच संपला असता तर याचा राजकारणात फायदा काहीच होणारा नव्हता. याला प्रत्युत्तर देण्यासाठी संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला. या व्यासपीठावरून आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, शशिकांत शिंदे, खा. अमोल कोल्हे आदींसह अनेक नेत्यांनी वाचाळवीरांचा बोलावता धनी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. यातूनच हा राजकीय संघर्ष पेटत चालला आहे.
या कृतीला प्रत्युत्तर म्हणून पालक मंत्री पाटील यांनी इशारा सभा घेऊन जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि विद्यमान संचालक दिलीप पाटील यांना घेरण्यासाठी बँकेच्या चौकशीची मागणी केली. तर वाशी बाजार समितीच्या माध्यमातून आमदार शिंदे, ठाणे आत्महत्या प्रकरणातून आमदार आव्हाड यांना घेरण्याचे तर लॉटरी घोटाळ्यात आमदार पाटील यांना अडचणीत आणण्याचे मनसुबे जाहीर केले.
सरकार यांचेच असताना चौकशी करण्यासाठी भाजप नेत्यांना कुणीही अडवलेले नाही. चौकशी तर व्हायलाच हवी, यातून दूध का दूध पाणी का पाणी होउदे. जिल्हा बँकेच्या चौकशीची मागणी करण्यात आमदार पडळकर, आमदार खोत आग्रही आहेत. यासाठी त्यांनी आंदोलन करत संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणीही केली. मात्र जिल्हा बँकेचा कारभार पहाणार्या संचालक मंडळात भाजपचेही संचालक आहेत. ते चौकशीस मान्यता देतील का हाही मुद्दा पालक मंत्री पाटील यांनी पक्षिय बैठकीत उपस्थित करावा.
आर्थिक स्थितीने सरकार अडचणीत आहे. विकास कामांना निधी उपलब्ध होत नसल्याची खुद्द सत्ताधारी आमदार खासगीत सांगत आहेत. अंदाजपत्रकात तरतूद नाही, पुरवणी मागण्यात स्थान नाही. कार्यकर्ते सांभाळणे कठीण झाले असल्याचे सांगत आहेत. आता खरे खोटे तेच जाणो. मात्र, तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कशा हाताळायच्या आणि जिंकायच्या हा खरा सर्वच राजकीय पक्षांसमोर प्रश्न आहे.
यंदा एकाच वेळी वारेमाप पडलेल्या पावसाने शेतीचे गणित बिघडले आहे. मग लोकांना निवडणुकीत काय सांगायचे हा प्रश्न आहे. यातून जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न तर संस्कृती बचाव आणि इशारा सभेच्या माध्यमातून होत नाही ना ?