मुंबई : महायुतीत मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारीचा घोळ सुरूच आहे. त्यामुळे भाजप व शिंदे गटाकडून मराठी नेते व चित्रपट अभिनेते- अभिनेत्रींचा उमेदवारीसाठी शोध सुरू आहे. सातारा, नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली, परभणी, दक्षिण मुंबई, वायव्य मुंबई अशा काही मतदारसंघांचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये खेचाखेची सुरू आहे. मतभेद नसल्याचे महायुतीकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात जोरदार वाद सुरू आहेत. भाजपने राज्यात ३२ जागा लढविण्याचे सुरूवातीला ठरविले होते. मात्र शिंदे-पवार यांनी अधिक जागांचा आग्रह धरल्याने भाजपला नरमाईची भूमिका घेऊन २८ जागांवर समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत.

दक्षिण मुंबईची जागा भाजपला विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्यासाठी हवी आहे. मनसेचा महायुतीमध्ये समावेश होणार, अशी चर्चा राज ठाकरे यांच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांबरोबर झालेल्या भेटीपासून सुरू असली तरी त्याबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. मनसेला दक्षिण मुंबईची जागा देणार की विधानसभेत काही जागा सोडण्याच्या आश्वासनावरच बोळवण करणार, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

हेही वाचा : वर्ध्यात राष्ट्रवादीच्याच दोघांमध्ये लढत ?

उत्तर मध्य मुंबई हा भाजपकडे असलेला मतदारसंघ असून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने त्याची मागणीही केलेली नाही. तरीही या जागेसाठी भाजप उमेदवाार घोषित करू शकलेला नाही. सर्वेक्षण अहवाल सकारात्मक नसल्याने व काही तक्रारींमुळे खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापले जाणार, अशी चर्चा सुरू आहे. त्यांनीही उमेदवार यादीत नाव न आल्याने १३ मार्चपासून मतदारसंघात प्रचार किंवा फिरण्याचे काम थांबविले आहे. या जागेसाठी आमदार आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र हा मतदारसंघ भाजपसाठी सर्वात अवघड व धोक्याचा असून मुस्लिम-ख्रिश्चन मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष असून त्यांना उमेदवारी मिळाल्यास मतदारसंघात अडकून पडावे लागेल. त्यांना महाजन यांचे कितपत सहकार्य मिळेल, याबाबतही शंका आहे. भाजपने मुंबईत दोन अमराठी उमेदवार दिले असून या मतदारसंघात मराठी उमेदवार द्यावा लागेल. त्यामुळे शेलार, आमदार पराग अळवणी यांच्या नावांसह मराठी कलावंतांच्याही नावांवर विचार व सर्वेक्षणे सुरू आहेत.

हेही वाचा : अमरावतीत बच्चू कडूंचा ‘प्रहार’ कुणाला तारक, कुणाला मारक?

वायव्य मुंबई मतदारसंघ शिंदे गटाकडे असून प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आहुजा यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना या मतदारसंघात उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू असली तरी शिंदे गटाकडून प्रसिद्ध अभिनेता सचिन खेडेकर यांच्यासह काही नावांवर विचार सुरू आहे. जागावाटपाचा तिढा व उमेदवारीचा घोळ दोन-तीन दिवसांत संपण्याची शक्यता आहे.