पश्चिम बंगालमधील भाजपा गटाने रविवारी कोलकातामध्ये ईद-अल-अधाच्या निमित्ताने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली. टीका करतेवेळी त्यांनी ईदनंतर रक्ताने माखलेल्या रस्त्यांची कथित दृश्ये शेअर केली. राज्यातील भाजपा प्रमुख सुकांता मुजुमदार यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्यावर तुष्टीकरणाच्या राजकारणाद्वारे राज्याला ग्रेटर बांगलादेश बनवत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
“जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्री स्वत: पश्चिम बंगालला तृष्टीकरणाने सत्तेवर टिकून राहण्यासाठी ग्रेटर बांगलादेश बनवण्यास उत्सुक आहेत, तेव्हा याचे परिणाम खूपच भयानक असतील”, असे मुजुमदार यांनी एका एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. रक्ताच्या नद्यांमध्ये रूपांतरित झालेल्या रस्त्यांची दृश्ये शेअर करताना मुजुमदार यांनी दावा केला आहे की, “काल एक विशिष्ट धार्मिक उत्सव साजरा झाल्यानंतर रस्ते लाल झाले आहेत. महापालिकेच्या नळांमधून वाहणारे पाणीदेखील रक्तात मिसळलेले आहे.”
राज्यातील भाजपाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून रस्त्यांची अशाप्रकारची दृश्ये शेअर करण्यात आली आहेत. यामध्ये रस्ते लाल झाल्याचे म्हटले आहे. “हो, हे ढाका नाही, कोलकाता आहे. इथे चौरंगी वॉर्ड ४४ मध्ये रस्ते रक्ताच्या नद्यांमध्ये परावर्तित झाले आहेत, यामुळे गंभीर संसर्ग आणि आजारांचा धोका निर्माण होतो. मात्र, प्रशासन शांत आहे”, असे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘फॅक्ट चेक:द ट्रुथ’ नावाच्या एका फेसबुक पेजने या व्हायरल व्हिडीओबाबत पडताळणी केली, त्यानंतर तो खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
खरा व्हिडीओ नेमका कुठला?
सप्टेंबर २०१६ मध्ये बांगलादेशातील ढाका इथे ही खरी घटना घडली होती. तिथे ईद साजरी झाल्यानंतर पाऊस पडल्याने रस्त्याचे असे विचित्र चित्र दिसत होते. या घटनेचा पश्चिम बंगाल किंवा कोलकाता महानगरपालिकेशी काहीही संबंध नाही, असेही त्या फॅक्ट चेकमध्ये म्हटले आहे. तसंच विरोधी पक्षांनी शेअर केलेले व्हिडीओ नेमके कुठून मिळवलेले आहेत याबाबत काही माहिती मिळालेली नाही. तसंच हा व्हिडीओ एखाद्या विशिष्ट राज्यातला, चित्रपटातला किंवा कार्यक्रमातला आहे का याबाबत सत्यता पडताळता आलेली नाही.
“आम्ही यावर काहीच भाष्य करणार नाही. भाजपाला हे फोटो, व्हिडीओ दाखवून लोकांना भडकवायचे आहे. हा कोणत्या प्रकारचा व्हिडीओ आहे, तो कोणत्या प्रकारचा फोटो आहे, तो कोणत्या राज्यातील आहे, कोणत्या चित्रपटातून घेतलेला आहे”, असे प्रश्न तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी उपस्थित केले आहेत.
दरम्यान, मार्चमध्ये कोलकातामध्ये झालेल्या ईदच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना धार्मिक दंगलींना प्रोत्साहन देणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले होते. यावेळी ममता बॅनर्जींनी आम्ही सर्व धर्मांसाठी जीवाची बाजी लावण्यास तयार आहोत असे म्हटले होते.
भाजपा आणि मार्क्सवादी पक्षावर कटाक्ष
भाजपा आणि मार्क्सवादी मिळून अराजकता पसरवण्याचं काम करत आहेत, असा आरोप ममतांनी केला होता. सामान्य नागरिक अराजकता पसरवत नाहीत, तर हे काम राजकीय पक्षांद्वारे केले जाते, असा आरोप त्यावेळी त्यांनी केला होता. “भाजपाला जर अल्पसंख्याकांच्या बाबतीत समस्या असेल तर ते देशाचं संविधान बदलतील का? “अशी टीकाही ममतांनी केली होती.