सांगली : जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीसाठी निवडणुकीचे घुमशान आता चालू झाले असून सत्ता संपादनासाठी राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. महायुती विरूध्द महाविकास आघाडी असा जरी वरकरणी सामना रंगणार असला तरी स्थानिक पातळीवर असलेल्या राजकीय संघर्षाची किनार असल्याने आघाडी धर्माला कधीही तिंलांजली देउन रणमैदानात उतरण्याची सर्वच राजकीय नेत्यांची इच्छा दिसत आहे. ईश्वरपूर, आष्टा या नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जेष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे, तर विटा नगरपालिका व आटपाडी नगरपंचायतीसाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्यातच सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच पाहण्यास मिळणार आहे.
जिल्ह्यातील विटा, ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव आणि जत या सहा नगरपालिकासाठी निवडणूक होत आहे. मागील वेळेप्रमाणे यावेळी नगराध्यक्ष निवडीसाठी थेट निवडणूक होत असल्याने या शहरात राजकीय वर्चस्व सिध्द करणारी ही निवडणूक ठरणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे दोन गट, शिवसेनेचे दोन गट, एकसंघ काँग्रेस, भाजप असे चार पक्ष सत्तेचे दावेदार असले तरी उमेदवार निवडीवरून अंतर्गत गटबाजीचा सामनाही नेत्यांना करावा लागणार आहे. नउ वर्षापुर्वी झालेल्या निवडणुकीवेळची राजकीय स्थिती आणि आजची राजकीय स्थिती यामध्ये जमिन अस्मानचे अंतर निर्माण झाले आहे. भाजप सत्तेवर असला तरी महायुतीतील घटक पक्षांना काही ठिकाणी भाजपची अडचण निर्माण होणार आहे, तर काही ठिकाणी अस्तित्वासाठी मित्रांबरोबर भाजपला राहावे लागणार आहे.
ईश्वरपूर नगरपालिकेसाठी आमदार जयंत पाटील विरोधात अन्य या पर्यायांचा विचार सुरू आहे. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविणार की केवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष म्हणून निवडणूक लढविणार हा आमदार पाटील यांना आघाडीतील अन्य घटक पक्षांचा सवाल आहे. कारण थेट नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांची उमेदवारी त्यांनी परस्पर जाहीर केली असून हे आपणास मान्य नाही म्हणत काँग्रेसचा सध्या तरी रूसवा आहे. काँग्रेसच्या रूसव्याला राष्ट्रवादी कितपत गांभीर्याने घेते हेही महत्वाचे ठरणार आहे. विस्कळीत विरोधक म्हणजे विजयाची तरतूद अशी आतापर्यंत आमदार पाटील यांची राजकीय खेळी राहिली आहे.
९ वर्षापुर्वी विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व विरोधक एकत्र आल्याने थेट नगराध्यक्ष निवडणुकीत आमदार पाटील यांना पराभूत व्हावे लागले. निशीकांत भोसले-पाटील यांनी ही निवडणुक जिंकली होती. आताही विरोधकामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर अद्याप एकमत झाले नसले तरी विश्वनाथ डांगे यांच्या नावाचा प्राधान्याने विचार सुरू आहे. तर याच तालुययातील आष्टा नगरपालिका निवडणुकीत स्व. विलासराव शिंदे यांचे चिरंजीव विशाल शिंदे यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आमदार पाटील यांनी जाहीर करून विरोधकांवर कडी केली आहे. याला शह देण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक राहूल महाडिक, ईश्वरपूरचे माजी नगराध्यक्ष भोसले-पाटील, आमदार सदाभाउ खोत, विक्रम पाटील, गौरव नायकवडी काय भूमिका घेतात हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.
विट्यात शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार सुहास बाबर यांनी स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी केली आहे. त्यांचे पारंपारिक विरोधक माजी नगराध्यक्ष वैभव पाटील भाजपमध्ये असले तरी त्यांना राजकीय अस्तित्वासाठी ही निवडणूक लढवावीच लागणार आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना विटा आणि आटपाडीच्या निवडणुकीत स्वारस्य असल्याने त्यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे. विटा नगरपालिका आणि आटपाडी नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढविण्याचा बाबर यांचा आग्रह अखेरपर्यंत राहणार हे स्पष्ट आहे. यामुळे महायुतीतच येथील निवडणूक अटीतटीची होणार आहे.
तासगावमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील यांनी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनाही राजकीय अस्तित्वासाठी मैदानात उतरावे लागणार आहे. भाजपनेही याठिकाणी आपले अस्तित्व पुन्हा दाखवण्यासाठी कंबर कसली असल्याने तिरंगी लढतीचा अनुभव या ठिकाणी येउ शकतो. जतमध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांनी आपले नातू संंग्राम जगताप यांना नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरवले आहे, तर माजी आमदार विक्रम सावंत यांनी अद्याप काँग्रेसचा उमेदवार कोण याची वाच्यता केली नसली तरी भाजप विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षानेही अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाहीत. भाजपचे आमदार पडळकर यांनीही अजून काही भाष्य केलेले नाही. यामुळे या ठिकाणी दोन्ही काँग्रेसला जगताप यांच्या आघाडीशी सामना करावा लागेल असे चित्र आहे.
पलूसमध्ये काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून होउ शकतो. मात्र, भाजपचे पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे निलेश येसुगडे यांच्या भूमिका महायुतीसाठी महत्वाच्या ठरणार आहेत.शिराळ्यात नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने पक्षिय पातळीपेक्षा गटबाजीचीच चिंता सर्वच पक्षांना भेडसावणार आहे. भाजपचे आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांना शह देण्याचा प्रयत्न माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडून होत असला तरी यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक त्यांच्यासोबत नाहीत. त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष पद आहे. तर भगतसिंग नाईक यांचा गट कोणासोबत मैदानात उतरणार हेही अस्पष्ट आहे.
