पक्षात  प्रवेश केल्यानंतर शिवबंधन बांधण्याची प्रथा शिवसेनेने गेली काही वर्षे पाळली. आता मात्र आमदारांच्या बंडानंतर सेनेचे खासदारही बंडाच्या पावित्र्यात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या पदाधिकाऱ्यांकडून शिवबॉण्ड लिहून घेण्यास सुरूवात केली आहे. पक्षासोबतच असल्याचे शपथपत्र १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर लिहून घेण्याची नवीन परंपरा आता सेनेमध्ये सुरू झाली आहे.

आमदारांच्या अभूतपूर्व बंडानंतर शिवसेनेत भूकंप झाला आहे. संघटनेत मोठ्या प्रमाणात फूट पडल्याचे दिसून येऊ लागले. नाराज शिवसैनिक, पदाधिकारी, नगरसेवक शिंदे गटात सहभागी होऊ लागले, खासदारांची नाराजी समोर येऊ लागली. उध्दव ठाकरे आपल्याच पक्षात एकाकी पडल्याचे चित्र दिसू लागले. संघटनात्मक फूट थोपवण्यासाठी शिवसेनेने आता पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा- काँग्रेसच्या वैदर्भीय नेत्यांमध्ये धुसफूस प्रदेशाध्यक्षांबाबत नाराजीचे सूर

स्वतः उध्दव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. आदित्य ठाकरे, संजय राऊत राज्यातील विवीध भागात जाऊन शिवसेना कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर अडगळीत टाकण्यात आलेले अनंत गीते यांच्यासारखे जुने जाणते नेतेही पक्षाच्या मदतीसाठी धावून आले आहेत. कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करून संघटनेच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले जात आहे. गद्दारांना धडा शिकवा अशी साद घातली जात आहे. तर दुसरीकडे कायदेशीर प्रश्न उपस्थित झाल्यास शिवसेना संघटना आपल्याच पाठीशी आहे. हे दाखविण्यासाठी शिवसेना नेतृत्वाने पाऊलं उचलली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून १०० रुपयांच्या बॉंण्ड पेपरवर आपण शिवसेनेतच असल्याचे आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे लिहून घेतले जात आहे. या शिवबॉण्डची शिवसेनेच्या गोटात चांगलीच चर्चा रंगते आहे. जिल्हाप्रमुखांवर हे शिवबॉण्ड लिहून घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे शंभर रुपयांच्या बाँण्ड पेपरची मागणी आणि खपही चांगलाच वाढला आहे.

हेही वाचा- भाजपच्या पक्षविस्ताराचा हुकमी एक्का, द्रौपदी मुर्मू! 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्वी पक्षाशी एकनिष्ठ राहण्यासाठी शिवसैनिकांना शिवबंधन बांधण्यात येत असे. पण नंतर अनेक जण हे शिवबंधन तोडून इतर पक्षात सहभागी होऊ लागले. त्यामुळे शिवबंधन कुचकामी ठरते की काय असा प्रश्न निर्माण झाला. आता ४० आमदारांच्या बंडानंतर पदाधिकाऱ्याकडून शिवबॉण्ड लिहून घेण्याचा प्रघात पक्षाने रूढ केल्याची चर्चा या निमित्ताने रंगली आहे.