संजीव कुळकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नांदेड : मागील काही वर्षांत जिल्ह्याच्या राजकारणातील स्थानिक नेत्यांच्या लेकी-सुनांचे राजकीय पदार्पण झाल्यानंतर काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांची नात व माजी मुख्यमंत्री अशोक व अमिता चव्हाण यांची कन्या श्रीजया हिचे राजकीय पदार्पण आता निश्चित झाले आहे.

चव्हाण दाम्पत्याच्या जुळ्या कन्यांपैकी श्रीजयाची राजकीय क्षेत्रातील रुची मागील काही वर्षांत दिसून येत होती. अलीकडच्या काळात काँग्रेस पक्षाच्या वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये तिचे छायाचित्र आवर्जून छापले जात आहे. चव्हाण परिवाराने तिच्या राजकीय पदार्पणाची घोषणा अधिकृतपणे केलेली नाही. चव्हाण दाम्पत्याच्या दोन्ही कन्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमध्ये झाले. श्रीजयाने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले असून आतापर्यंत दोन्ही कन्या आई-वडिलांच्या निवडणूक प्रचार काळात वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्याचे, मतदारांना भेटल्याचे सर्वांना ठाऊक आहे. पण आता अशोक चव्हाणांची राजकीय वारस म्हणून श्रीजयाचे नाव निश्चित मानले जात असून भारत जोडो यात्रेदरम्यान तिच्या राजकीय पदार्पणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या यात्रेच्या व्यापक प्रसिद्धीसाठी तयार करण्यात येत असलेल्या फलकांवरील लक्षवेधी घोषणा, त्यांवरील छायाचित्रे आणि त्यांची रचना करण्याच्या कामात श्रीजया सक्रिय असल्याचे दिसते.

हेही वाचा… Maharashtra News Live : राज्यातील सत्तासंघर्षावर आता चार आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

जिल्ह्यात माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या स्नुषा डॉ.मीनल, भाजपचे दिवंगत नेते संभाजी पवार यांच्या स्नुषा पूनम आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकरांची कन्या प्रणिता देवरे यांनी पाच वर्षांपूर्वी जि.प.च्या माध्यमातून राजकीय पर्दापण केले. या तिघींसह जुन्या व नव्या काळातील अन्य नेत्यांच्या लेकी-सुनाही राजकारणात उतरल्याचे जिल्ह्याने पाहिले. त्यानंतर आता श्रीजया चव्हाण हेही नाव राजकीय मंचावर येत आहे. शंकरराव आणि कुसुमताई चव्हाण यांच्या कुटुंबाचा पाच कन्या आणि एक मुलगा असा विस्तार झाला. त्यांच्या मुलींपैकी कोणीही सक्रिय राजकारणात आले नाही. अशोक चव्हाण यांनी शंकररावांचा राजकीय वारसा पुढे नेताना मागील दशकात पत्नी अमिता यांना राजकारणात आणले; पण पाच वर्षांच्या आमदारकीनंतर त्या निवडणुकीतून बाजूला झाल्या. त्या अनेक वर्षे साखर कारखान्याच्या संचालक व काही काळ उपाध्यक्ष होत्या. आता त्यांच्यानंतर श्रीजयाच्या रूपाने चव्हाण कुटुंबातील दुसरी महिला राजकारणाच्या वाटेवर आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या अनपेक्षित पराभवामुळे त्यांच्या समर्थकांसह चव्हाण परिवाराला मोठा धक्का बसला. त्यावेळी वडिलांना सावरण्यात आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना सज्ज करण्यात दोन्ही मुलींनी महत्त्वाची भूमिका बजावली. नंतरच्या तीन वर्षांत चव्हाण यांची जनसंपर्क यंत्रणा श्रीजयाने पडद्यामागून सांभाळली, तसेच अनेक सार्वजनिक कार्यक्रमांच्या नियोजनात भूमिका पार पाडली. मात्र राजकीय वाद तसेच चव्हाणांवर विरोधी नेत्यांकडून होणारे आरोप व टीका यांच्या संदर्भात तिने कुठलेही भाष्य केले नाही.

हेही वाचा… निलेश राऊत : माणसांना जपणारा कार्यकर्ता

श्रीजयाच्या राजकीय पदार्पणाबद्दल चव्हाण परिवाराचे निकटवर्ती तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांत चर्चा चाललेली असताना, अलीकडे एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये श्रीजया चव्हाण थेट व्यासपीठावर दिसल्यानंतर तिच्या राजकीय पदार्पणाचे प्राथमिक वृत्त झळकले होते. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनिमित्त श्रीजयाच्या राजकीय पदार्पणावर शिक्कामोर्तब होईल, असे येथे मानले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srijaya ashok chavan will make her political debut in bharat jodo yatra print politics news asj
First published on: 01-11-2022 at 12:07 IST