छत्रपती संभाजीनगर : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना विजयी होण्यासाठी झुंजायला लावणारे सुरेश बनकर यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सिल्लोडमध्ये काही महिन्यापूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे यांनी कमावलेली राजकीय शक्ती पुन्हा एकदा शुन्यावर आली आहे.

सिल्लोडमध्ये सत्तार यांच्या विरोधात उमेदवारांचा शोध घेताना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला दमछाक करावी लागली होती. भाजपमध्ये काम करणारे बनकर यांनी उद्धव ठाकरे गटात जाऊन निवडणूक लढविली. बनकर यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनीही मोठी साथ दिली होती. निवडणुकीमध्ये सत्तार यांना विधानसभा निवडणुकीमध्ये टक्कर देणाऱ्या बनकर यांनी पुन्हा मूळ पक्षात जाण्याचे ठरवले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ते स्वगृही परतणार आहेत.

मराठवाड्यात सिल्लोड मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आरेरावीला कंटाळून भाजप नेत्यांनी सुरेश बनकर यांना उद्धव ठाकरे गटात पाठवले. भाजपचे कार्यकर्तेही ठाकरे गटाला मदत करत असल्याचे वेगळेच चित्र गेल्या निवडणुकीमध्ये सिल्लोड मतदारसंघात दिसत होते. सुरेश बनकर निवडून यावेत यासाठी भाजपने जोर लावला होता. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारणे ही राजकीय सोय असल्याची जाणीव भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये होती. राजकीय मेहनत घेऊनही सुरेश बनकर यांना यश मिळाले नाही. अब्दुल सत्तार २५०० मतांनी विजयी झाले. या मतदारसंघात महिला मतदारांनी सर्वाधिक मतदान केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा निवडणुकीनंतरही भाजप कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षास मदत करत आहेत, असे चित्र कायम दिसत होते. भाजप विचारणीतील कार्यकर्त्यांना ठाकरे यांचे नेतृत्व कायम स्वरुपी स्वीकारणे विरोधाभासी असल्याने बनकर यांना पक्ष बदलावा यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव होता. युतीमधील विधानसभा मतदारसंघाच्या वाटणीमध्ये शिवसेना हाच पर्याय असल्याने सुरेश बनकर यांना पुन्हा भाजपमध्ये जाणे हाच एकमेव पर्याय होता.