संतोष प्रधान

भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांपुढे सहा महिन्यांच्या मुदतीत विधानसभेवर निवडून येण्याचे आव्हान असेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची गेल्या दोन वर्षांत अशीच काहीशी विचित्र अवस्था झाली होती.

त्रिपूराच्या मुख्यमंत्रीपदी चारच दिवसांपूर्वी डॉ. माणिक साहा यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय गेल्या महिन्यात विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊनही उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी पुष्करसिंह धामी यांना भाजपने संधी दिली होती. या दोन्ही मुख्यमंत्र्यांना घटनेतील तरतुदीनुसार सहा महिन्यांत

निवडून यावे लागणार आहे.उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत मिळाले असले तरी मुख्यमंत्री धामी हे पराभूत झाले. भाजपने त्यांचीच फेरनिवड केली. धामी यांना सहा महिन्यांच्या मुदतीत विधानसभेवर निवडून येता यावे म्हणून भाजपच्या एका आमदाराने राजीनामा दिला. चंपावत या मतदारसंघात ३१ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. धामी यांच्यासाठी ही पोटनिवडणूक म्हणजे मोठे आव्हान असेल. या निवडणुकीत पराभव झाल्यास भाजपवर मोठी नामुष्की येईल तसेच धामी यांची राजकीय कारकीर्दच संपुष्टात येण्याची भीती आहे. यामुळेच धामी हे सावध झाले आहेत. त्यातच चंपावत मतदारसंघातील काही नागरिकांनी धामी यांना विरोध केला आहे. मतदारसंघात तशा आशयाची पोस्टर्स लागली आहेत. भाजपने धामी सहजपणे निवडून येतील अशाच मतदारसंघातील आमदाराचा राजीनामा घेऊन धामी यांचा विजय सुकर केला आहे.

त्रिपुरात चार विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक होणार आहे. चार जागा सध्या रिक्त आहेत. भाजपच्या दोन आमदारांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपच्या एका आमदाराला पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्र ठरविण्यात आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आमदाराच्या निधनाने एक जागा रिक्त झाली. चारपैकी एका मतदारसंघात मुख्यमंत्री साहा यांना रिंगणात उतरविले जाणार की भाजपचे श्रेष्ठी एखाद्या सोप्या मतदारसंघाचा पर्याय मुख्यमंत्र्यांना देतात हे लवकरच समजेल. डॉ. साहा हे राज्यसभेचे खासदार असल्याने त्यांना सहा महिन्यांत विधानसभेवर निवडून येणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी उत्तराखंडमध्ये तीर्थसिंह रावत यांना सहा महिन्यांत विधानसभेवर निवडून येणे शक्य नव्हते. यामुळे त्यांना अवघ्या चार महिन्यांतच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेतृत्वाने डॉ. साहा यांची मुख्यंत्रीपदी निवड करताना योग्य खबरदारी घेतली असावी.

गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला घवघवीत यश मिळाले होते. मात्र मुख्यमंत्री व पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला होता. सहा महिन्यांच्या मुदतीत पोटनिवडणूक जाहीर व्हावी म्हणून ममतादिदींनी किती ओरड केली होती. शेवटी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आणि सहा महिन्यांच्या मुदतीत ममता बॅनर्जी या विधानसभेवर निवडून आल्या. राज्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहा महिन्यांची मुदत संपता संपता विधान परिषदेवर निवडून आले होते.