देशात सध्या राज्यसभेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. राज्यसभेची निवडणूक असलेल्या प्रत्येक राज्यात राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी स्थानिक नेत्यांची धावपळ सुरू आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराजी नाट्याचे प्रयोग रंगत आहेत. बिहारमध्येसुद्धा हाच नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह यांना राज्यसभेची उमेदवारी न देण्याचा निर्णय जनता दल युनायटेडने घेतला आहे. या निर्णयामुळे भाजपा अडचणीत येण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये भाजपा हा जनता दल युनायटेडचा मित्र पक्ष असून सत्तेतील प्रमुख भागीदार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यसभेची उमेदवारी नाकारले गेलेले सिंह हे जनता दल युनाटेड सोडून भाजपामध्ये सामील होण्यास इच्छुक आहेत. मात्र भाजपाचे केंद्रीय नेतृत्व राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकांच्यापूर्वी नितीश कुमार यांना दुखवू इच्छित नाही.

भाजपा प्रवेशाची शक्यता?

दरम्यान, सिंह यांनी भाजपा प्रवेशाची शक्यता नाकारली असली तरी त्यांना राज्यसभेत प्रवेश मिळावा ही भाजपाची इच्छा असल्याचं समजते. कारण आरएसएसच्या अनेक नेत्यांशी सिंह यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. मात्र त्यासोबतच भाजपाला नितीश कुमार यांना सध्या नाराज करायचे नाही आहे. सिंह यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय धर्मेंद्र प्रधान आणि भुपेंद्र यादव यांची भेट घेऊन चर्चा केली. दिल्लीहून पाटण्याला निघताना ते म्हणाले की ” मी भाजपात जाणार का ? असे मला सारखे का विचारले जात आहे? मला या चर्चा कायमच्या थांबवायच्या आहेत. मी जनता दल युनाटेडमध्येच आहे हे लक्षात ठेवा आणि याबाबत मी सध्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह ( लालन सिंह) यांना संगितले आहे. 

राजकीय ताकद

या विषयात भाजपाच्या झालेल्या कोंडीविषयी बोलताना भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की “आरसीपी सिंह यांचे भाजपाच्या सर्व प्रमुख नेत्यांशी आपुलकीचे संबंध आहेत. त्यांना पुन्हा सभागृहात बघण्याची पक्षाची इच्छा आहे. पण सिंह यांच्याकडे नितीश कुमार यांना आव्हान देण्यासाठी पुरेशी राजकीय ताकद नाही”.  भाजपासुद्धा मित्र पक्षांमधील संबंध अधिक ताणले जाऊ नये या प्रयत्नात आहे. त्यासाठीच चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाटण्यात पाठवण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आरसीपी सिंह हे खुलेआम त्यांच्या मनातील नारजीविषयी बोलत नसले तरी त्यांच्या निकटवर्तीयांनी सोशल मीडियावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. सिंह यांचे हे निकटवर्तीय पक्षाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांनी केलेल्या टिकेवर आम्ही काही बोलू इच्छित नाही अशी प्रतिक्रिया जनता दल युनायटेडने दिली आहे.