Raj Thackeray Political Stand: दोन महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबत जोरदार चर्चा सुरू असताना राज ठाकरे यांनी सर्व राजकीय विश्लेषकांना पुन्हा एकदा बुचकळ्यात टाकले आहे. दोन महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी साद दिली, त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाची तयारी झाली, संजय राऊतांनीही ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची प्रत राज ठाकरेंना पाठवली. या घडामोडी एका बाजुला सुरू असताना दुसरीकडे राज ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
मुंबईतील एका हॉटेलमध्ये गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र शिवसेनेचे (शिंदे) नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी यावर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय अर्थ काढले गेले. माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, राजकारणात कशाचाही अंदाज बांधणे कठीण आहे. निवडणुकीपर्यंत अनेकदा असे यु-टर्न पाहायला मिळू शकतात. राजकारणात टिकाव धरण्यासाठी युती करावी लागते. राज ठाकरेंना आम्ही आधीच युतीचा प्रस्ताव दिलेला आहे. ते महायुतीत आल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अधिक ताकदीने लढता येतील.
राज्यात येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात असले तरी राज ठाकरेंच्या राजकीय शैलीशी परिचित असणाऱ्यांना ही भेट आश्चर्यकारक वाटणार नाही. राज ठाकरेंनी यापूर्वीही सत्ताधारी आणि विरोधक यांच्याशी जवळीक साधणारी राजकीय भूमिका घेतलेली आहे.
२००६ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. तेव्हापासून झालेल्या निवडणुकांमध्ये मनसेचा मतदानाचा टक्का कमी कमी होत गेल्याचे दिसले. मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मताचा टक्का १.५५ टक्क्यांवर आला. तरीही राज्याच्या राजकारणात राज ठाकरे यांचे वेगळे स्थान आहे.
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे असलेले वक्तृत्व आणि प्रादेशिक अस्मितेला हात घालण्याची त्यांची हातोटी, यामुळे शहरी भागातील मतदार त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणात आकर्षित होत असतो. त्यामुळेच राज्यातील सर्व पक्षांना राज ठाकरेंशी युती हवीहवीशी वाटते.
मनसेचा राजकीय इतिहास
बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर २००६ साली राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली. तीन वर्षांनी २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी ५.७५ टक्के मतदान खेचत १३ ठिकाणी विजय मिळविला होता. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला फार प्रभाव टाकता आलेला नाही.
२०१४, २०१९ आणि २०२४ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी विविध राजकीय भूमिका घेतलेल्या होत्या. मात्र या भूमिकांचा त्यांना कोणताही राजकीय लाभ मिळू शकलेला नाही. यावर्षी एप्रिल महिन्यात चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राचे हित इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठे आहे. महाराष्ट्र हितासाठी मी किरकोळ वाद वाजूला ठेवून उद्धवबरोबर काम करण्यास तयार आहे.
या विधानामुळे राज ठाकरे गंभीरपणे उद्धव ठाकरेंशी युती करण्याचा विचार करत असल्याचे संकेत मिळाले होते. मात्र गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे आता पुन्हा एकदा संभ्रमावस्थता निर्माण झाली आहे.
भाऊ एकत्र आल्यामुळे परिणाम साधू शकतो
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच वैचारिक प्रवाह आणि कुटुंबातून पुढे आलेले आहेत. मात्र त्यांचा राजकीय प्रवास वेगळ्या वाटांनी गेला. महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतांचे एकीकरण होण्यास मोठा हातभार लागू शकतो. विशेष करून मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये या युतीचा परिणाम दिसू शकतो.
ठाकरे बंधूंची युती झाल्यास बाळासाहेबांना मानणाऱ्या जुन्या शिवसैनिकांसाठी हा भावनिक क्षण असू शकेल. एकाबाजुला राज ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, गर्दी जमविण्याची त्यांची क्षमता आणि उद्धव ठाकरेंचा संयमी भूमिका याच्यातून मराठी मतांना एकत्र करण्यात त्यांना यश येऊ शकते.
भाजपाला मनसेत रस का?
भाजपाला मनसेची साथ नेहमीच महत्त्वाची वाटते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जो मतदार आहे, त्यात राज ठाकरेही वाटेकरी आहेत. मनसे, शिवसेना आणि भाजपा अशी तिरंगी लढत झाल्यामुळे भाजपाला त्याचा अनेकदा लाभ मिळालेला आहे. भाजपासाठी अनुकूल असलेला आणखी घटक म्हणजे, जागावाटपात राज ठाकरे यांची शिवसेनेपेक्षा (ठाकरे) नमती भूमिका. तसेच राज ठाकरे यांना पाठिंबा देऊन शिंदे यांची वाढती लोकप्रियता रोखण्याचे भाजपाचे दीर्घकालीन ध्येय असू शकते.