राजेश्वर ठाकरे
नागपूर : लोकहितासाठी संघर्ष करण्याचा वडिलांकडून मिळालेला वारसा पुढे नेत व पुढे राजकारणात प्रवेश करून युवक काँग्रेसचा एक सामान्य कार्यकर्ता ते संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस अशी वाटचाल करणारे काँग्रेस नेते बंटी शेळके पक्षाचे नागपुरातील तरुण नेतृत्व म्हणून मागील काही वर्षांत नावारूपास आले आहे. यांत्रिकी अभियांत्रिकीची पदविकाप्राप्त ४३ वर्षीय बंटी शेळके यांचे वडील बाबा शेळके काँग्रेस विचारसरणीचे. ते त्यांच्या ‘घंटानाद’ या संघटनेच्या माध्यमातून लोकहिताच्या प्रश्नावर आंदोलन करीत असत. त्यांच्यापासून प्रेरणा घेत बंटी शेळके यांनीही लोकांच्या प्रश्नावर स्थानिक प्रशासनाशी दोन हात करण्याची भूमिका घेत आंदोलने सुरू केली. राजकारणात आल्याशिवाय संघर्षाला धार येणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलने सुरू केली. प्रथम त्यांनी प्रभागातील समस्यांचे मुद्दे हाती घेतले. २०१७ मध्ये त्यांनी प्रथम महापालिका निवडणूक लढवली व भाजपचा बालेकिल्ला असलेल्या महाल भागातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले. एक संघर्षशील नगरसेवक अशी त्यांची सभागृहात प्रतिमा होती. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना सरकार विरोधात अनेक आंदोलने केली. हे करताना त्यांनी समाजमाध्यमांचा खुबीने वापर केला. त्यामुळे ते घराघरात पोहोचले. अनेकदा तुरुंगवासही भोगला. करोना साथीने थैमान घातले असताना लोकांच्या मदतकार्यात स्वत:ला झोकून दिले. या काळात स्वत:च्या पाठीवर फवारणी यंत्र ठेवून प्रभागात घरोघरी जाऊन कीटकनाशकाची फवारणी केली, महापालिका नाले सफाई करीत नसल्याने बंटी शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी नालेसफाई केली. बंटी शेळके म्हणजे लोकांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता, अशी त्यांची प्रतिमा तयार झाली.

हेही वाचा >>>समीर राजूरकर : ध्येयनिष्ठ कार्यकर्ता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युवक काँग्रेसमध्ये काम करीत असताना त्यांनी संघ व भाजप विरोधात आक्रमकपणे आंदोलने केली. केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात रेल्वे रोको आंदोलन केले. वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस श्रेष्ठींचेही लक्ष वेधून घेतले. पक्षाने त्यांच्यातील कार्यकर्ते जोडण्याची कला ओळखून त्यांच्यावर संघटनेत विविध जबाबदाऱ्या सोपवणे सुरू केले. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी संघटनेचे पदाधिकारी निवडणुकीद्वारे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडणूक प्रक्रियेतून निवड झालेले पहिले अध्यक्ष होण्याचा मान बंटी शेळके यांना मिळाला. त्यानंतर त्यांच्याकडे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्षपद सोपवण्यात आले. पुढच्या काळात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व त्यानंतर राष्ट्रीय सरचिटणीस अशी मोठी झेप त्यांनी संघटनेत घेतली. कर्नाटक, मध्य प्रदेश, दिल्ली विधानसभा, उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीत त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात केलेल्या आंदोलनात ते सिंधू सीमेवर ७२ दिवस मुक्कामी होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही सुरुवातीपासून त्यांचा सहभाग आहे.