आधार कार्डच्या कॉल सेंटरकडूनच संतापजनक उत्तरे

एकाच दिवशी एकाच यंत्रावर दोघांनी आधार कार्डसाठी नोंदणी केली. त्यानंतर एकाचे कार्ड आठच दिवसांत संकेतस्थळावर झळकले आणि महिन्याभरात घरीही पोहोचले. पण, त्याच्याआधी काही मिनिटांपूर्वी आधारसाठी नोंदणी केलेल्याचे कार्ड अद्याप संकेतस्थळावरही दिसत नाही.. असे का घडले असावे, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी आधारच्या कॉल सेंटरशी संपर्क साधला. पण, कॉल सेंटरकडून देण्यात आलेल्या उत्तरांनी ते अवाक् झाले. ‘आधार कार्ड कधी मिळणार याला काही तर्क नसतो. तीस ते नव्वद दिवसांत ते कधीही येते’, असे हे तर्कशून्य आणि संतापजनक उत्तर होते..!

विविध शासकीय योजना, बँका, मोबाइल आदींसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आल्यामुळे आधार कार्ड काढणे सर्वाची गरज झाली आहे. शहरात आधार केंद्रांची संख्या कमी असल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यात भर म्हणून नोंदणी केल्यानंतरही वेळेत कार्ड न देणे आणि त्याबाबत विचारणा केल्यास तर्कशून्य उत्तरे देऊन नागरिकांचा छळ केला जात आहे. सजग नागरिक मंचचे अध्यक्ष आणि माहिती-अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते विवेक वेलणकर यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. वेलणकर आणि त्यांच्या मुलाने ७ डिसेंबर २०१७ रोजी महापालिकेच्या वारजे कर्वेनगर वॉर्ड कार्यालयात आधार नोंदणीची प्रक्रिया केली. त्यानंतर एका आठवडय़ातच मुलाचे आधार कार्ड संकेतस्थळावर दिसू लागले. त्यानंतर महिन्यानी ते घरीही पोहोचले. मात्र, वेलणकर यांचे कार्ड अद्याप संकेतस्थळावरही दिसत नसल्याने याबाबत विचारणा करण्यासाठी त्यांनी १९४७ या क्रमांकावर आधारच्या कॉल सेंटरशी संपर्क साधला.

कॉल सेंटरमधील संबंधिताने नाव, पत्ता, राज्य, जिल्हा, पिन क्रमांक, जन्म दिनांक आणि नोंदणी क्रमांक आदी सर्व माहिती विचारली. ती दिल्यानंतर ‘माझे आधार कार्ड अद्याप का मिळाले नाही’, अशी विचारणा वेलणकर यांनी केली. ‘आपले कार्ड प्रक्रियेत आहे, काही तांत्रिक समस्या असेल’ असे उत्तर त्यांना मिळाले. अजून किती दिवस लागतील, असे विचारल्यानंतर शासनाच्या नियमानुसार ३० ते ९० दिवसांत ते कधीही मिळेल, असे सांगण्यात आले. मात्र, जाहीर केल्यानुसार ते ३० दिवसांत मिळायला हवे, असा प्रतिप्रश्न वेलणकर यांनी केला. त्याचप्रमाणे ‘माझ्या मुलाचे कार्ड महिन्याभरात घरी पोहोचले, मी त्याच्यापूर्वी कार्ड नोंदणी करूनही माझे कार्ड अद्याप संकेतस्थळावरही का दिसत नाही. त्याची प्रक्रिया नेमकी काय असते’, अशी विचारणा वेलणकर यांनी केली.

त्यावर संबंधिताने ‘आधार कार्ड कधीही येते, त्याचा काही तर्क नसतो’ असे उत्तर दिले. आपण दिलेल्या या उत्तराची ध्वनिफीत संबंधित शासकीय विभागाला पाठवू का, अशी विचारणा केल्यानंतर त्यावर ‘हो, पाठवू शकता’ असे संतापजनक उत्तरही देण्यात आले. या सर्व प्रकाराबाबत वेलणकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आधारसाठी नागरिकांचा होणारा छळ यातून अधोरेखित होत असून, या व्यवस्थेचा कारभार यातून उघडय़ावर आला असल्याचे वेलणकर म्हणाले.