08 March 2021

News Flash

पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे निधन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली होती बदली

पुण्याचे विद्यमान अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे आज सकाळी पुणे येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. एक कार्यक्षम व उमदा अधिकारी गमावल्याने त्यांच्या मित्र परिवारासह अनेक अधिकार्‍यांनी तसेच सातारा जिल्ह्यातील महसुली कर्मचार्‍यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

१० ऑगस्ट २०१७ रोजी साहेबराव गायकवाड यांनी सातारा अप्पर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला होता. जिल्ह्यातील त्यांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले होते. धरणग्रस्तांचे प्रश्‍न, मिळकतीच्या वादातील खटले त्यांनी अतीशय कौशल्याने चालवून जनसामान्यांना न्याय देण्याचे काम केले होते. अतिशय मनमिळावू अधिकारी म्हणून महसूल विभागात ते परिचित होते. दरम्यान १७ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांची पुणे येथे अप्पर जिल्हाधिकारी पदावर बदली झाली होती. तेथेही त्यांनी आपल्या उत्कृष्ट कामाचा ठसा उमटवला होता. मात्र, राज्यात सरकारची खांदेपालट होताच त्यांची बदली पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर माजी कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांचे पुतणे विजय देशमुख यांची बदली करण्यात आली होती. मात्र या बदलीच्या विरोधात ते न्यायालयात गेले होते. न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच साहेबराव गायकवाड यांच्या बाजूने निकाल देत त्यांची बदली पुन्हा त्यांच्या मूळ आस्थापनेवर म्हणजेच पुणे अप्पर जिल्हाधिकारीपदी केली होती. बदलीच्या घोळामुळे ते अनेक दिवस तणावात होते, अशी देखील माहिती समोर येत आहे.

दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला होता. असे असताना आज सकाळी पुणे येथील राहत्या घरी त्यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली व एका मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यावर त्यांचे मूळ गाव रिधोरे, ता. माढा, जि. सोलापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. अतीशय कार्यक्षम, मनमिळावू अधिकारी हरपल्याने पुणे व सातारा महसूल विभागातील अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांनी हळहळ व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 1:20 pm

Web Title: additional collector of pune sahebrao gaikwad passed away msr 87 kjp 91
Next Stories
1 अधिकाऱ्यांच्या परस्पर निर्णयाने गोंधळ
2 टाळेबंदीत सायबर चोरटे सक्रिय
3 कामगार, विद्यार्थ्यांना अन्य जिल्ह्य़ांमध्ये नेण्यासाठी एसटी सज्ज
Just Now!
X