सध्या ऑनलाइन शॉपिंगचे पेव फुटले आहे. अगदी मोबाइलवरून एखाद्या उत्पादनाची मागणी नोंदवता येते आणि तुम्हाला हवी असलेली वस्तू तुमच्या घरपोच होते. मात्र, सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरातील एका नागरिकाने ऑनलाइन फुडप्रोसेसर मागविल्यानंतर त्याला चक्क रिकामे खोके पाठविण्यात आले. त्या सजग नागरिकाने ग्राहक मंचात धाव घेऊन या प्रकाराबाबत तक्रार नोंदविल्यानंतर ग्राहक मंचाने ‘आस्क मी बझार डॉट कॉम’ या ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रातील कंपनीला दणका दिला. फुडप्रोसेसरचे पाच हजार रुपये परत करण्याचे आदेश देतानाच संबंधित तक्रारदाराला नुकसानभरपाईपोटी पाच हजार रुपये देण्याचेही आदेश ग्राहक मंचाने दिले.
ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात आणि सदस्य क्षितिजा कुलकर्णी यांनी नुकताच या प्रकरणाचा निकाल दिला. सिंहगड रस्त्यावर हिंगणे खुर्द येथील रहिवासी शैलेश देशपांडे यांनी उत्तर प्रदेशातील नोएडा येथील आस्क मी बझार डॉट कॉम विरुद्ध ग्राहक मंचात तक्रार दिली होती. देशपांडे यांनी गेल्या वर्षी १५ ऑगस्ट २०१५ रोजी आस्क मी बझार डॉट कॉम संकेतस्थळावर प्रेस्टीज मॅस्ट्रो प्लस फुड प्रोसेसर विथ युनिक आइस क्रशर या उत्पादनाची मागणी नोंदविली होती. त्यानंतर पंधरा दिवसांनी देशपांडे यांच्या घरी आस्क मी बझारकडून खोके पाठविण्यात आले. आकर्षक वेष्टनात असलेले खोके त्यांनी पाहिले आणि फुड प्रोसेसर घरी पोचते झाल्याचा आनंदही त्यांना झाला. मात्र, काही वेळात त्यांचा हिरमोड झाला. त्यांनी खोके उघडून पाहिले तर ते रिकामे होते.
देशपांडे यांनी तातडीने आस्क मी बझार डॉट कॉमच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी ईमेलद्वारे त्यांची तक्रार नोंदविली. मात्र, त्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले नाही. त्यामुळे देशपांडे यांनी ग्राहक न्याय मंचात तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला. देशपांडे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांद्वारे त्यांनी फुड प्रोसेसरसाठी पैसे भरल्याचे स्पष्ट झाले होते.
आस्क मी बझारला नोटीस पाठवूनही कंपनीच्या वतीने ग्राहक न्याय मंचात कोणी उपस्थित राहिले नाही. अथवा कंपनीच्या वतीने कोणी बाजू मांडण्यास देखील पुढे आले नाही. एखादे उत्पादन ऑनलाइन खरेदी केल्यानंतर ग्राहकाला उत्पादन न देणे ही ‘त्रुटीयुक्त सेवा’ असल्याची टिप्पणी करून ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात व सदस्य क्षितिजा कुलकर्णी यांनी निकाल दिला. देशपांडे यांनी फुड प्रोसेसरच्या खरेदीसाठी भरलेली रक्कम परत करण्याचे आदेश देण्यात आले तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून पाच हजार रुपये देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.