पुणे महापालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या बालगंधर्व आणि स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. ‘बालगंधर्व’ पुरस्कार डॉ. नंदकिशोर कपोते यांना, तर ‘स्वरभास्कर’ पुरस्कार डॉ. प्रभा अत्रे यांना प्रदान केला जाणार आहे.
महापौर चंचला कोद्रे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदाचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार डॉ. नंदकिशोर कपोते यांना जाहीर झाला असून स्मृतिचिन्ह, शाल आणि एकावन्न हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवड समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. सर्व पदाधिकारी आणि पक्षनेते या वेळी उपस्थित होते. या बैठकीत पुरस्कारांबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला.
‘बालगंधर्व’ पुरस्काराबरोबरच सहकलाकारांनाही दरवर्षी पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी यंदा शिवराज वायचळ (दिग्दर्शन), सदाशिव कांबळे (वेशभूषा), गिरीश गोडबोले (व्यवस्थापन साहाय्य), राजेश वाघ (प्रकाश योजना) आणि श्रुती कुमार करंदीकर (गझल गायिका) यांची निवड करण्यात आली आहे. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि अकरा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
महापालिकेतर्फे दरवर्षी संगीत क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ‘स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी’ पुरस्कार प्रदान केला जातो. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह, शाल आणि एक लाख अकरा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. महापालिकेने हा पुरस्कार सन २०११ मध्ये सुरू केला असून आतापर्यंत गानसम्राज्ञी लता मंगेशकर, पं, बीरजूमहाराज आणि पं. शिवकुमार शर्मा यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jun 2014 रोजी प्रकाशित
‘बालगंधर्व’ पुरस्कार कपोते यांना; प्रभा अत्रे यांना ‘स्वरभास्कर’ पुरस्कार
पुणे महापालिकेतर्फे दिला जाणारा ‘बालगंधर्व’ पुरस्कार डॉ. नंदकिशोर कपोते यांना, तर ‘स्वरभास्कर’ पुरस्कार डॉ. प्रभा अत्रे यांना प्रदान केला जाणार आहे.
First published on: 14-06-2014 at 03:17 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balgandharv and swarabhaskar awards declared