|| चिन्मय पाटणकर

राज्यातील सर्वाधिक आठ, देशातील ३० संस्थांचा अहवालात समावेश

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) जाहीर केलेल्या ‘बेस्ट प्रॅक्टिसेस इन इन्स्टिटय़ूशन’ अर्थात चांगले काम होणाऱ्या संस्था या अहवालात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. देशभरातील ३० संस्थांचा समावेश असलेल्या या अहवालात महाराष्ट्रातील सर्वाधिक आठ संस्थांचा समावेश आहे.

महाविद्यालयांतर्फे विद्यार्थ्यांसाठी केले जाणारे शैक्षणिक, मार्गदर्शनपर उपक्रम, गुणवत्तावाढीसाठी करण्यात आलेले प्रयत्न या अनुषंगाने देशभरातील तंत्रशिक्षण महाविद्यालयांनी एआयसीटीईला माहिती पाठवली होती. त्यातून देशभरातील ३० संस्थांची निवड करण्यात आली. या संदर्भातील ४४ पानांचा अहवाल ‘एआयसीटीई’ने नुकताच प्रसिद्ध केला आहे.

‘राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राने आघाडी घेणे ही आनंदाची गोष्ट आहे. काही महाविद्यालये विद्यार्थ्यांसाठी, गुणवत्तावाढीसाठी उपक्रम करतात, तर काही महाविद्यालये असे उपक्रम राबवत नाहीत. उपक्रम न करणाऱ्या महाविद्यालयांसाठी हा अहवाल मार्गदर्शक ठरेल. या अहवालामध्ये क्रमवारी देण्यात आलेली नाही. एआयसीटीईचा हा चांगला उपक्रम आहे. त्यातून नवे काही करण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन मिळेल,’ असे ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. प्रदीप माने यांनी सांगितले.

राज्यनिहाय संस्था

  • महाराष्ट्र – ८
  • तामिळनाडू – ४
  • पश्चिम बंगाल – ३
  • तेलंगणा – ३
  • कर्नाटक – ३
  • दिल्ली – २
  • गुजरात – २
  • जम्मू काश्मीर, पंजाब, अंदमान निकोबार, उत्तर प्रदेश
  • हरयाणा प्रत्येकी – १

निवड झालेल्या राज्यातील संस्था

  • वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली</li>
  • कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी)
  • टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिटय़ूट, इचलकरंजी
  • इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल इंजिनिअरिंग, माटुंगा, मुंबई</li>
  • विद्या प्रतिष्ठानचे पॉलिटेक्निक महाविद्यालय, इंदापूर
  • आर्मी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे
  • वाचलंद इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर
  • ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे

देशभरातील महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या चांगल्या उपक्रमांची माहिती पाठवण्यासाठी महाविद्यालयांना कळवले होते. देशभरातील २५० महाविद्यालयांनी माहिती पाठवली. त्यातून ३० संस्था निवडण्यात आल्या. या संस्थांमधील चांगले उपक्रम इतर महाविद्यालयांना कळतील. ते त्यांच्यासाठी उपयुक्त ठरतील. अर्थात अहवालात जाहीर करण्यात आलेल्याच संस्था सर्वोत्तम आहेत असे नाही. या संस्थांपेक्षाही अधिक चांगले काम करणाऱ्या संस्था असू शकतात. उपलब्ध झालेल्या माहितीतून तीस संस्थांची निवड झाली. पुढील वर्षी हा उपक्रम अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे.    – डॉ. अनिल सहस्रबुद्धे, अध्यक्ष, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद