केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून धनिकांच्या हितासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. परदेशातच रमणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटारडे असून मंत्र्यांच्या उद्योगांमुळे तोंड लपवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. महाराष्ट्रातही घोटाळेबाज मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संरक्षण आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी चिंचवडला केली. दोन्हीकडील सरकारवर संघाचा ‘रिमोट कंट्रोल’ आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
शहर काँग्रेस आयोजित ‘केंद्र व राज्यातील सरकारचा पर्दाफाश’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष सचिन साठे होते. सावंत म्हणाले, भाजप सरकारने खूप आश्वासने दिली, वल्गना केल्या. मात्र, ते जनतेसमोर उघडे पडले. २८२ खासदार निवडून देणाऱ्या जनतेचा त्यांनी विश्वासघात केला. महागाई, काळा पैसा, ‘अच्छे दिन’ अशा कितीतरी घोषणा त्यांनी केल्या, प्रत्यक्षात जनतेची चेष्टाच चालवली आहे. दलित, आदिवासींचे बजेट कमी केले. बिहार पॅकेजची आकडेवारी खोटी आहे. मुळात मोदीच खोटारडे असून त्यांनी बोगसपणाची हद्द ओलांडली आहे. शेतक ऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, महागाई वाढली, निर्यात घटली, रोजगारनिर्मिती खुंटली, भांडवली वस्तूंचे उत्पादन घटले. भ्रष्टाचाराच्या विषयावरून रान उठवणारे मोदी त्यांच्या पक्षात भ्रष्टाचार बोकाळला असताना तोंड लपवत आहेत. मोदी स्वपक्षीयांच्या उद्योगांमुळे तोंडघशी पडले आहेत. धनिकांच्या हितरक्षणासाठी त्यांचा आटापिटा दिसतो. मोदी २५ देश फिरले, त्याचा भारताला उपयोग नाही. शेतक ऱ्यांच्या आत्महत्या सुरू असताना त्यांचे परदेशभ्रमण सुरू आहे. महाराष्ट्रातही दुर्दैवी परिस्थिती आहे. मंत्र्यांचे एकेक घोटाळे उजेडात येत आहेत. लोणीकर, बावनकुळे, मुंडे यांची प्रकरणे ताजी आहेत, तावडे बोगस शिक्षणमंत्री आहेत, रणजित पाटील तर लखोबा लोखंडे आहेत. मात्र, मुख्यमंत्री सर्वाना ‘क्लीन चीट’ देत सुटले आहेत. नरेंद्र बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू नेवाळे यांनी आभार मानले.
‘पटेलांचे आंदोलन
मोदींसाठी धोक्याची घंटा’
पटेलांना आरक्षण पाहिजे, या मागणीसाठी आंदोलन सुरू झाल्यानंतर गुजरात पेटले. ‘गुजरात पॅटर्न’ फसवा आहे. या आंदोलनामुळे गुजरातमधील खरी परिस्थिती सर्वासमोर आली. सरकारच्या विरोधातील असंतोष ही मोदींसाठी धोक्याची घंटा आहे, अशी टिपणी सचिन सावंत यांनी केली.