स्वारगेट येथील जेधे चौकातील उड्डाणपुलाचा एक खांब पुलाच्या मध्यापासून सरकल्यासारखा दिसत आहे. त्याबाबत पीपल्स युनियनचे संयोजक अॅड. रमेश धर्मावत यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांना निवेदन दिले आहे. याबाबतचे छायाचित्र आणि मजकूर ‘व्हॉट्स अॅप’वरही मोठय़ा प्रमाणात फिरत असून, त्याबाबत उलटसुलट चर्चाही सुरू आहे.
पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मार्फत स्वारगेट येथील जेधे चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचा एक खांब पुलाच्या मध्यापासून एका बाजूस सरकल्यामुळे पुलाचा दुसऱ्या बाजूचा भाग हवेत लटकल्यासारखा दिसत आहे. या सदृश परिस्थितीमुळे ये-जा करणाऱ्या पादचारी व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या पुलाचे बांधकाम आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार बनविलेल्या मंजूर नकाशाप्रमाणे झाले आहे का, याची चौकशी करण्यात यावी आणि या झालेल्या कामाचे सेफ्टी ऑडिट करण्यात यावे. तसेच जर या पुलाचे काम चुकले असेल तर कर संबंधित अधिकारी, तज्ज्ञ सल्लागार व काम करणारा ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या वेळी विनय ढेरे, राकेश नामेकर, कैलास कानगुडे, नितीन दुधकर, समीर शेख, डॉ. विक्रम गायकवाड आदी उपस्थित होते.