उक्तीप्रमाणे कृती हा महात्मा गांधींचा संदेश अनुसरला तरच भविष्यात काँग्रेसच्या विजयाचा पाया घातला जाईल, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले. पुण्यातील काँग्रेस भवनच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला राणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी प्रा. विकास देशपांडे यांनी संपादित केलेल्या ‘प्रिय बापू’ या स्मरणिकेचे राणे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी अखिल भारतीय काँग्रेसच चिटणीस शौराज वाल्मीकी, महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी बालाराम बच्चन, डॉ. विश्वजित कदम, शहर अध्यक्ष अॅड. अभय छाजेड, उल्हास पवार आदी उपस्थित होते. गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचार दर्शनावर आधारित असलेल्या नऊ चित्ररथांची ‘महात्मा गाधी विचार दर्शन’ अभिवादन यात्रा काढण्यात आली.
निवडणुकांमध्ये पराजय का झाला, याबद्दल नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांनी कठोर आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नव्या जोमाने प्रयत्नशील राहावे, असा सल्लाही या वेळी राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला. छाजेड यांनी या वेळी गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून परतले त्या घटनेचा शतकमहोत्सव आणि नामदार गोखले स्मृती कार्यक्रमाचा आढावा घेतला.