२२ वर्षांनी जपानहून पुण्यामध्ये दाखल

पुणे : पुस्तकामध्ये वापरण्यासाठी जपान येथे नेण्यात आलेले ‘विष्णू अवतार’ हे सचित्र हस्तलिखित पत्रव्यवहारानंतर २२ वर्षांनी पुण्यामध्ये दाखल झाले आहे. तब्बल ६० चित्रांचा समावेश असलेले ‘विष्णू अवतार’ हे हस्तलिखित सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचे आहे.

टेंभुर्णीजवळील (जि. सोलापूर) सापटणे या गावी भालचंद्र जोशी यांच्याकडे असलेले ‘विष्णू अवतार’ हे सचित्र हस्तलिखित १९९८ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला मिळाले होते. यामध्ये विष्णूच्या राम, कृष्ण आणि परशुराम अशा अवतार कथा खास मराठमोळ्या शैलीमध्ये रंगविलेल्या होत्या. या हस्तलिखितामधील चित्रांतील महिला नऊवारी साडीमध्ये, तर पुरुष धोतर आणि बंडी या पेहरावामध्ये दाखविण्यात आले होते, अशी माहिती भांडाकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी ग्रंथपाल आणि प्राचीन हस्तलिखितांचे अभ्यासक वा. ल. मंजूळ यांनी दिली.

जपानमधील टोयो विद्यापीठामध्ये कार्यरत असलेल्या प्रा. शिमिझू यांनी १६४८ मधील सचित्र भागवत पुराणाचे पुस्तक भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे तत्कालीन मानद सचिव आणि ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ. रा. ना. दांडेकर यांच्या संमतीने प्रकाशित केले होते. त्यासाठी त्यांना ‘युनेस्को’च्या जपान शाखेचे अर्थसाह्य़ लाभले होते. त्यानंतर प्रा. शिमिझू यांनी त्यांच्या संशोधन कार्याचे पुस्तक करण्यासाठी ‘विष्णू अवतार’ या सचित्र हस्तलिखिताची छायाचित्रे टिपली होती.  एका दुर्दैवी घटनेनंतर भांडारकर संस्थेच्या ग्रंथालयात हे हस्तलिखित नसल्याची माहिती मिळाल्याचे मंजूळ यांनी सांगितले.

वर्षभरापूर्वी प्रा. शिमिझू यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांनी नेलेली छायाचित्रे तसेच निर्मिती करण्यात आलेला ग्रंथ पाठवावा, अशी विनंती मी केली होती, असे मंजूळ यांनी सांगितले. हा ग्रंथ काही प्रसिद्ध झाला नाही, पण त्यांनी टिपलेली हस्तलिखिताची पृष्ठे आणि त्यातील छायाचित्रे रंगीत झेरॉक्स स्वरूपात परत पाठविली. त्यामुळे दुर्मीळ असलेले हे सचित्र हस्तलिखित २२ वर्षांचा प्रवास करून पुण्याला पोहोचले, असेही मंजूळ यांनी सांगितले.