कोणी ‘ओटीपी’ च्या प्रतीक्षेत, तर कोणाला पुढील वर्षीची ‘अपॉइंटमेंट’

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : करोना प्रतिबंधक लसीकरण सामान्यांसाठी खुले के ल्याने मोठय़ा संख्येने नागरिक नावनोंदणी करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, को-विन अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणींमुळे ही नावनोंदणी करणे आव्हान ठरत आहे. काही नागरिकांना नोंदणीसाठी आवश्यक ‘ओटीपी’ येत नाही. काहींना थेट पुढील वर्षीची ‘अपॉइंटमेंट’ मिळते तर मोजक्या नागरिकांना त्वरित ‘डोस’ ही मिळाला आहे.

शहरात सोमवारपासून साठ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. लस घेण्यास इच्छुक नागरिकांची नावनोंदणीही सुरू झाली आहे. को-विन अ‍ॅपमधील तांत्रिक अडथळ्यांमुळे ही नावनोंदणी नागरिकांसाठी डोके दुखी ठरत आहे. नाव आणि संपर्क  क्रमांक नोंदवल्यानंतर १८० सेकं दांमध्ये ‘ओटीपी’ येणे अपेक्षित आहे. तो दोन तासही येत नाही. ज्यांची नोंदणी त्वरित पूर्ण होते, त्यांना लसीकरणासाठी पुढील वर्षांतील वेळ दिली जाते. त्याचवेळी काही नागरिकांना मात्र पहिल्या प्रयत्नातच नोंदणी पूर्ण होऊन लशीचा पहिला डोसही मिळाला आहे.

प्रभात रस्त्यावरील श्वेता रणदिवे म्हणाल्या, को-विन अ‍ॅपवरून नाव नोंदणीसाठी बराच प्रयत्न के ला, मात्र ओटीपी न मिळाल्याने तो प्रयत्न सोडून दिला. सहज आरोग्य सेतु अ‍ॅपवरून नावनोंदणी करायचा प्रयत्न के ला तेव्हा त्वरित नावनोंदणी झाली, मात्र लस घेण्यासाठी फेब्रुवारी २०२२ मधील वेळ दाखवली जात आहे. खासगी रुग्णालयांची यादी उपलब्ध झाल्यावर प्रयत्न करून पाहणार असल्याचेही श्वेता रणदिवे यांनी सांगितले. संजय गुप्ते म्हणाले, को-विन अ‍ॅपवरून नावनोंदणी होऊ शकली नाही, म्हणून को-विन संकेतस्थळावरून प्रयत्न के ला. सध्या केवळ सरकारी रुग्णालयांचीच यादी उपलब्ध आहे. ससूनसह सर्व रुग्णालयांचा पत्ता ‘आंबेगाव, पुणे’ असा दाखवला जात आहे. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ होऊ शकतो. एका मित्राने थेट सुतार दवाखान्यात जाऊन नावनोंदणी के ली असता नोंदणी प्रक्रियाही जलद झाली आणि लस घेण्यासाठी दुसऱ्या दिवशीची निश्चित वेळही मिळाल्याचे गुप्ते यांनी सांगितले.