पुणे : शहरातील सक्रिय करोनाबाधित रुण्यांच्या संख्येत गेल्या अकरा दिवसांमध्ये घट झाल्याचे पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटीकडून जाहीर करण्यात आले आहे. सक्रिय बाधित रुग्णांची टक्के वारी १९ एवढय़ापर्यंत खाली आहे. ७ ऑगस्टपर्यंत सक्रिय बाधित रुग्णांची टक्के वारी २७ एवढी होती. बाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

महापालिका आणि पुणे स्मार्ट सिटीने ७ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीतील सक्रिय बाधित रुग्णांच्या संख्येवरून हे निरीक्षण नोंदविले आहे. ७ ऑगस्ट रोजी सक्रिय बाधित रुग्णांची संख्या १७ हजार ३३ एवढी होती. ती १७ ऑगस्ट रोजी १४ हजार ४४२ पर्यंत खाली आली, अशी माहिती स्मार्ट सिटी आणि महापालिके कडून जाहीर करण्यात आली आहे. करोना संसर्गावर उपचार करून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७८.३२ टक्के  असे आहे.

शहरात मार्च महिन्यात करोना संसर्गाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर जून-जुलैपर्यंत बाधित रुग्णांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली. जुलै अखेपर्यंत तर सक्रिय बाधित रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला होता. मात्र ऑगस्ट महिन्यापासून सक्रिय बाधित रुग्णांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत बाधित रुग्णांची टक्के वारी झपाटय़ाने खाली आली आहे, असे स्मार्ट सिटीकडून सांगण्यात आले.

१७ ऑगस्टपर्यंत शहरात ७४ हजार ९३३ रुग्णांपैकी ५८ हजार ७०६ रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले, तर १७ ऑगस्टपर्यंत १ हजार ७८५ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ८५ टक्के  नागरिक हे ५० वर्षांपुढील असल्याची माहिती महापालिके च्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. शहरातील मृत्युदरही २.३८ टक्के  असा राहिला आहे.