जुन्या शहरात लागू असलेला दोन एफएसआय छपाईतील चुकीमुळे दीड झाला असून ही चूक दुरुस्त करण्याच्या दृष्टीने नियोजन समिती आवश्यक ती प्रक्रिया करेल व पुढील महिन्याच्या पालिका सर्वसाधारण सभेपुढे दोन एफएसआय लागू करण्यासंबंधीचा प्रस्ताव येईल, असे मंगळवारी जाहीर करण्यात आले. दरम्यान, आराखडय़ावरील हरकतींची सुनावणी आता सुरळीत सुरू झाली आहे.
पुणे शहरासाठी जो प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला, त्यात दीड एफएसआय देण्याबाबतची नियमावली प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, पेठांमध्ये अडीच एफएसआयची मागणी असताना दोन एफएसआयचा दीड एफएसआय का केला अशी विचारणा करण्यात आली. त्यावर ती छपाईतील चूक असून प्रशासन ही चूक स्वत:हून दुरुस्त करेल, असे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात प्रशासनाने तसा कोणताही प्रस्ताव नियोजन समितीपुढे ठेवला नाही. त्यामुळे ही चूक दुरुस्त करण्याची जोरदार मागणी विरोधी पक्ष तसेच पुणे बचाव समितीकडून केली जात होती.
या मागणीबाबत नियोजन समितीची मंगळवारी पुणे बचाव समितीबरोबर बैठक झाली. समितीचे सुहास कुलकर्णी, उज्ज्वल केसकर आणि प्रशांत बधे तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले या वेळी उपस्थित होते. समितीच्या वतीने अभय छाजेड यांनी चर्चा केली. एफएसआयची जी छपाईतील चूक झाली आहे, ती दुरुस्त करण्यासाठी नियोजन समिती प्रस्ताव तयार करेल व तो पक्षनेत्यांशी चर्चा करून अंतिम मान्यतेसाठी मुख्य सभेपुढे येईल. पुढील महिन्याच्या सभेत तो मंजूर होईल व त्यानंतर जुन्या हद्दीत पूर्वीप्रमाणेच दोन एफएसआय लागू होऊ शकेल, असे या वेळी सांगण्यात आले. प्रशासनाने आराखडा प्रकाशित करताना ज्या चुका केल्या आहेत त्याचे विषयपत्रही मंगळवारी समितीला सादर करण्यात आले.
आराखडय़ाच्या नकाशात नदीचे पात्र दर्शवणारी रेषा व पूररेषा नाही. त्यामुळे तसे नकाशे समितीला प्रशासनाकडून दोन दिवसात उपलब्ध करून दिले जातील, असेही या वेळी सांगण्यात आले. शहरातील पेठांमध्ये जी रस्तारुंदी दर्शवण्यात आली आहे त्याचे कोणतेही माप नकाशांमध्ये नाही. त्यामुळे रस्ता किती रुंद केला जाणार आहे ही माहिती प्रसिद्ध करा, अशीही मागणी सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांनी केली. ही माहिती प्रसिद्ध करून सुनावणीची संधी द्या, असेही समितीला सांगण्यात आले.
 
एफएसआय: आठ महिन्यात अभिप्राय नाही
एफएसआयबाबत छपाईत जी चूक झाली, त्यावर स्थायी समितीमध्येही मंगळवारी चर्चा झाली. हेमंत रासने आणि अन्य सदस्यांनी त्याबाबत प्रश्न उपस्थित केले. दीड एफएसआय कधी लागू केला आणि केवळ तुमच्या चुकीमुळे गावठाणाचा पूर्ण विकास थांबला आहे. ही चूक कशी दुरुस्त केली जाणार आहे, असे प्रश्न रासने यांनी या वेळी विचारले. आराखडय़ाच्या प्रसिद्धीनंतर २८ मार्च २०१३ पासून दीड एफएसआय लागू केला आहे. ही चूक दुरुस्त करण्यासंबंधीचा अभिप्राय मागवला असला, तरी तो आठ महिन्यात आलेला नाही, असे या वेळी सांगण्यात आले. त्यावर हा अभिप्राय पुढच्या आठ दिवसात आला नाही, तर आंदोलन करावे लागेल याची दखल घ्या, असा इशारा सदस्यांनी प्रशासनाला दिला.