शहरात जुलैपासून सुरू झालेला डेंग्यूचा प्रादुर्भाव आता वाढत असून संशयित डेंग्यू रुग्णांच्या संख्याबरोबरच प्लेटलेटची संख्या कमी झाल्यामुळे बाहेरून प्लेटलेट हा रक्तघटक द्यावे लागणाऱ्या रुग्णांची संख्याची वाढत असल्याचे चित्र आहे.
बुधवारी शहरात ७ संशयित डेंग्यू रुग्ण सापडले, तर ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत आढळलेल्या संशयित डेंग्यूरुग्णांची संख्या ६१ आहे. जूनमध्ये केवळ ११ संशयित डेंग्यूरुग्ण सापडले होते. जुलैत ही संख्या ७५ झाली आणि ऑगस्टपासून हा प्रादुर्भाव अधिक दिसू लागला. डेंग्यू आणि डेंग्यूसदृश आजारांचे रुग्ण वाढत असून डेंग्यूमध्ये प्लेटलेट कमी होऊन हा रक्तघटक बाहेरून द्यावा लागणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याची मााहिती सार्वजनिक रोगांचे तज्ज्ञ डॉ. भारत पुरंदरे यांनी दिली. ते म्हणाले, ‘गेल्या वर्षी जून-जुलै मध्ये डेंग्यूचे रुग्ण सापडू लागले होते व साथ फेब्रुवारीपर्यंत टिकली होती. त्यातही ऑगस्टपासून नोव्हेंबर-डिसेंबपर्यंत रुग्णांची संख्या अधिकच होती. तेच चित्र या वर्षी दिसेल असे वाटते. डेंग्यूच्या रुग्णांच्या लक्षणांमध्ये बदल झालेला आढळलेला नाही. यात अचानक ताप येतो, पाठ, सांधे, हात-पाय, डोके, डोळे दुखतात. काही रुग्णांमध्ये झोपेचे चक्र बदलते, तर काही जणांना पोटदुखी व जुलाब होतात.’ डेंग्यूच्या काही रुग्णांना घसादुखी देखील होते, त्यामुळे अशा वेळी स्वाइन फ्लू आणि डेंग्यूचे रुग्ण वेगळे ओळखणे अवघड जाऊ शकते. डेंग्यूचा ताप तीव्र असल्यामुळे रुग्णांनी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
‘संशयित’ डेंग्यू रुग्ण म्हणजे काय?
‘राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमा’द्वारे कीटकजन्य आजारांविषयीची मार्गदर्शक तत्त्वे ठरवली जातात. या यंत्रणेने डेंग्यूची खात्री करण्यासाठी दोन चाचण्या प्रमाण मानल्या आहेत. ‘एलायझा आयजीएम’ आणि ‘एलायझा एनएस १ अँटीजेन’ या त्या दोन चाचण्या आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, ‘डेंग्यूचा विषाणू शरीरात गेल्यानंतर ५ ते ६ दिवसांनंतर रक्तात ‘आयजीएम’ ही अँटिबॉडी दिसू लागते. त्यामुळे ही चाचणी पहिल्या ५-६ दिवसांत डेंग्यूचे निदान करत नाही. या काळात ‘एनएस १ अँटिजेन’चाचणीद्वारे निदान करतात. ‘रॅपिड एनएस १ अँटीजेन’ ही चाचणी देखील डेंग्यूसाठी केली जात असली, तरी ती डेंग्यूची खात्री करण्यासाठी मान्य केली जात नाही, एलायझा चाचणी ग्राह्य़ मानली जात असून इतर डेंग्यू रुग्णांना संशयित डेंग्यू रुग्ण म्हटले जाते. या एलायझा चाचण्यांव्यतिरिक्तच्या चाचणीत डेंग्यू नसतानाही चाचणीत तो दिसू शकतो. शिवाय डेंग्यूची चाचणी झाली नाही, तरीही त्यावरील उपचारात फरक पडत नाही. या आजारावर लक्षणांवरूनच उपचार केला जातो.’