मराठी अस्मितेचा जागर करणाऱ्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना निमंत्रण दिले नसल्यामुळे आमच्या दृष्टीने हे संमेलन संपले आहे, अशा शब्दांत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी संमेलनाच्या आयोजकांवर शुक्रवारी टीका केली.
मराठी साहित्यसंमेलन म्हणताना ‘डीपीयू’ या इंग्रजी अक्षरांनी स्वागत झाले. एकेकाळी संमेलनाध्यक्ष काय संदेश देतात हे साहित्यप्रेमी रसिक आणि नागरिक कान देऊन ऐकत असायचे. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आधी मराठी बाणा दाखविणारे अध्यक्ष नंतर माफी मागून मोकळे झाले आणि त्यांनीच संमेलनाचे सूप वाजविले, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले.
एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या ग्रंथनगरीमध्ये साहित्य दरबारतर्फे शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून, त्याचे उद्घाटन रावते यांच्या हस्ते झाले. खासदार श्रीरंग बारणे, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे या वेळी उपस्थित होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी रावते यांचा सत्कार केला. विनायक धारणे आणि मनीषा धारणे यांनी हे प्रदर्शन भरविले आहे. इंग्रजी हीच खरी ज्ञानभाषा आणि िहदी ही राष्ट्रभाषा असे संमेलनाध्यक्षांनी भाषणातून सांगितले. मात्र, मराठी कुठे याचा बोध झाला नाही. असे आमचे मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष आहेत, याकडेही रावते यांनी लक्ष वेधले. शिवसेनाप्रमुखांनी त्या काळामध्ये काढलेल्या व्यंगचित्रांमधील परिस्थिती आजही तेवढीच लागू पडते. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष नेहरूंना दगड मारतानाच्या चित्राचा दाखला त्यांनी या वेळी दिला. मोठे व्यापारी सरकारचे आणि सरकार छोटय़ा व्यापाऱ्यांची गचांडी धरत आहेत हे चित्र अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांना भेट द्यायला हवे, अशी टिप्पणीही रावते यांनी केली.