‘मेक इन महाराष्ट्र’ प्रकल्प राबविण्यात हे सरकार अपयशी ठरल्याने त्यांना ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र प्रकल्प’ हाती घेण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर मेक इन महाराष्ट्रच्या अंतर्गत लाभ घेतलेल्या तरुण आणि कंपन्याची आकडेवारी देखील सरकारकडून खोटी सांगण्यात आली आहे. ही निषेधार्थ बाब असून सर्व यामुळे भविष्यात राज्यासमोर गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
गेल्या चार वर्षांत राज्यातील कंपन्या मोठ्या प्रमाणावर गुजरातमध्ये गेल्या आहेत. त्यामुळे इथल्या तरुणांचा रोजगार बुडाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे असल्यानेच कंपन्या तिकडे जात आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांमकडून याबाबत कुठल्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. या प्रश्नावर मुख्यमंत्री पंतप्रधानांसमोर निमूट आहेत, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर सडकून टीका केली.
चव्हाण म्हणाले, राज्यातील विविध भागातील तरुण वर्गाच्या हाती रोजगार नसल्याने तरुण वर्ग कमालीचा नैराश्यामध्ये सापडला असून यावर सरकार काहीही उपाय योजना करताना दिसत नाही. त्यात या सरकारकडून मेक इन महाराष्ट्र अंतर्गत दरवर्षी रोजगार उपलब्ध होणार अशी घोषणा करण्यात आली होती. ही घोषणाचं राहिल्याचे सद्यस्थितीला दिसून येत आहे. आता दोन दिवसांपूर्वी मॅग्नेटिक महाराष्ट्राची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र, हीच घोषणा आम्ही आघाडी सरकारच्या काळात केली होती, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला.
पंजाब नॅशनल बँकेतून ११ हजार कोटी रुपये घेऊन निरव मोदी पळून गेला आहे. त्यांनी सर्वांना चुना लावून परदेशात पळून गेला आहे. त्यावर केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची पावले उचली जात नसून नीरव मोदी भारतात परत येणार नसल्याची शक्यता चव्हाण यांनी व्यक्त केली.
चव्हाण म्हणाले, पंजाब नॅशनल बँकेचे ११ हजार कोटी रुपये निरव मोदी हा व्यावसायिक घेऊन परदेशात निघून गेला आहे. त्यामुळे या बँकेतील खातेदार चिंतेत आहे. यावर या सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. या घटनेला आठवडाभराचा कालावधी उलटून गेला तरी देखील सरकारकडून कोणत्याही प्रकारची नीरव मोदीबाबत भुमिका जाहीर केली जात नाही. तसेच बँकेच्या संबधीत प्रकरण असल्याने यावर अर्थमंत्री अरुण जेटली देखील गप्प आहेत. याचा निषेध असून त्यांनी या प्रकरणाची जबाबादारी स्विकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले, ज्या प्रकारे विजय मल्ल्या आणि ललित मोदी ला परदेशात सर्व सामान्याचे पैसे घेऊन पळून गेले. त्याप्रमाणे निरव मोदी पैसे घेऊन परदेशात गेला आहे. तो भारतात येणार नसल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. यावर सरकारने योग्य ती पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर यापूर्वी देखील ललित मोदी आणि विजय मल्ल्या पैसे घेऊन बाहेर जाण्यात भाजपचा हात असल्याचे पुराव्यावरून स्पष्ट केले आहे. आता देखील भाजपनेच नीरव मोदीला बाहेर जाण्यास मदत केल्याचे सांगत भाजपवर त्यांनी निशाणा साधला.