आकुर्डी रेल्वेस्थानक परिसरात एका सराईतावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना शनिवारी (२३ जुलै) रात्री घडली. पूर्ववैमनस्यातून सराईतावर हल्ला झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
अमित अशोक चव्हाण (वय २६, रा. वृंदावन सोसायटी, चिखली) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आदित्य अहिरराव (वय २६), संदेश चोपडे (वय २७, दोघे रा. काळेवाडी), संदीप पवार (वय २६, रा. पिंपरी गाव) यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्याचे आरोपी अहिरराव, चोपडे, पवार यांच्याशी भांडण झाले होते. शनिवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास तो आकुर्डी रेल्वेस्थानक परिसरातून निघाला होता. त्या वेळी आरोपी अहिरराव, चोपडे व पवार यांनी त्याला इंडसइंड बँकेसमोर अडवले. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले, तसेच त्याच्यावर पिस्तुलातून एक गोळी झाडून ते पसार झाले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकरराव अवताडे तपास करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jul 2016 रोजी प्रकाशित
आकुर्डी रेल्वेस्थानक परिसरात सराईतावर गोळीबार
अमित अशोक चव्हाण (वय २६, रा. वृंदावन सोसायटी, चिखली) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-07-2016 at 02:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing in akurdi railway station area